लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशवासीयांना एकतेचा संदेश देण्यासाठी येथे प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेली ‘दौड’ केवळ एक पदयात्राच ठरली. याउलट शाळांना दीपावलीच्या सुटय़ा असल्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी हमखास उपलब्ध होणारा विद्यार्थिवर्ग या एकता दौडसाठी मिळू न शकल्याने गर्दी जमविण्याकरिता प्रशाकीय यंत्रणेला जे प्रयत्न करावे लागले, तीच खरी त्यांच्यासाठी ‘दौड’ ठरल्याचे मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांच्या जयंतीचे निमित्त साधून एकता दौडचे आयोजन केले होते. सुटीच्या कालावधीत होणाऱ्या या दौडसाठी गर्दी जमविण्याचे आव्हान स्थानिक यंत्रणेपुढे उभे ठाकले. विद्यार्थी कुठून उपलब्ध होतील, गर्दी कशी जमेल, याचा शोध घेण्यात येऊ लागला. सुटय़ांमध्येही नियमितपणे सरावाला येणारे खो-खो, कबड्डी तसेच व्हॉलीबॉल खेळाडू.. विविध प्रकारच्या शिबिरांना उपस्थित मुले.. मविप्र संस्थेच्या नर्सिग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी.. भोसला विद्यालयाच्या मैदानावर सराव करणारे धावपटू.. महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीवर्ग.. गृहरक्षक.. भारतीय माजी सैनिक संघटनेचे सदस्य, असे करीत कुठे ४००-५०० जणांपर्यंत आकडा गेला. या आकडय़ावरच समाधान मानत सर्व नियोजन करण्यात आले. नियोजनाबरहुकूम सकाळी साडेसातच्या सुमारास सर्व जण छत्रपती शिवाजी स्टेडियमवर जमले. या ठिकाणी मंचावर जिल्हाधिकारी विलास पाटील, महापौर अशोक मुर्तडक, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिल्यानंतर एकता दौडसाठी सर्व जण स्टेडियमच्या बाहेर पडले.
स्टेडियमबाहेर पडताच दौड सुरू होईल, असे वाटत असताना महात्मा गांधी रस्त्याने निघाली ती पदयात्रा. प्रारंभी असणाऱ्या उघडय़ा वाहनावर शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त स्नेहल विधाते, बुद्धिबळपटू विदित गुजराथी, धावपटू अंजना ठमके, किसन तडवी आदी उपस्थित होते. या वाहनामागे सर्व जण शिस्तबद्ध रीतीने पायी चालत होते. मेहेर सिग्नल, सीबीएस आणि त्र्यंबक सिग्नलमार्गे ही अनोखी दौड मग गोल्फ क्लब मैदानावर पोहोचली. त्या ठिकाणी दौडचा समारोप झाला.
बळजोरीचा मामला
एकता दौडमध्ये सहभागी खेळाडू आणि विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही उत्साह दिसून आला नाही. बळजोरीचा मामला असल्यानेच सर्व या दौडमध्ये सामील झाल्याचे त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियांवरून जाणवले. दौड असली तरी अपवाद वगळता कोणीही धावत नव्हते. झपझप पावले उचलत एकदाचे शेवटचे टोक गाठावयाचे या निर्धारानेच सर्व जण चालत होते. काही सहकारी पुढे गेल्याचे जाणवताच थोडेफार धावून अंतर कमी करण्याचा प्रयत्न होत असे. महिलांची तर अक्षरश: दमछाक झाल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Run for unity become morning walk
First published on: 01-11-2014 at 01:05 IST