सीपीआर इस्पितळातील १२५ कर्मचाऱ्यांच्या भरतीचा गतीने पाठपुरावा करणे, शेंडापार्क येथे १०० खाटांचे ग्रामीण रुग्णालय व फॉरेन्सिक लॅब सुरू करणे, डॉक्टरांचे थकीत वेतन तातडीने अदा करणे आदी निर्णय शुक्रवारी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बैठकीवेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेतले. उपस्थित डॉक्टर व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तक्रारींचा मारा सुरू केल्यावर मंत्री पाटील यांनी तक्रारी करीत न बसता रुग्णांच्या गरजा ओळखून गतिमान कारभार करण्याचा सल्ला दिला. शिवाय प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन इस्पितळातील कामकाजाचा आढावा घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.    
येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रलंबित कामांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्री पाटील यांनी आज बैठक घेतली. अधिष्ठाता डॉ.एम.व्ही.परचंड यांच्यासह उपस्थित डॉक्टर व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इस्पितळ चालविताना येत असलेल्या अडचणींचे कथन केले. त्यामध्ये डॉक्टरांचे वेतन वेळेवर न मिळणे, अपुरे कर्मचारी असल्यामुळे कामाचा ताण वाढणे, हृदयरोग विभाग व अन्य विभागांतील समस्या, रुग्णांना होणारा त्रास, शासकीय पातळीवर प्रलंबित असणारी कामे आदी मुद्दय़ांचा समावेश होता.
इस्पितळामध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर गृहराज्यमंत्री पाटील यांनी उद्यापासून दोन पोलीस सुरक्षेसाठी वाढविण्यात येतील, असे स्पष्ट केले. तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची तक्रार केल्यावर पाटील यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या नोंदी ठेवा, असे सांगून प्रशासनाला फटकारले. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना निम्मे वेतन मिळत असल्याची तक्रार आल्याचे नमूद करून पाटील यांनी असा प्रकार पुन्हा घडल्यास मक्तेदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. फिटनेस सर्टिफिकेट देताना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करून याबाबतच्या तक्रारी तत्काळ दूर करण्याचे आदेश दिले.     
अँजिओप्लास्टीकरिता खासगी इस्पितळाच्या तुलनेत जादा रक्कम आकारली जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालय व महाविद्यालयातील अनेक कामे शासकीय पातळीवर शेवटच्या टप्प्यात आहेत. मात्र त्याचा पाठपुरावा होत नाही. याकरिता स्वतंत्र अधिकारी नेमावा. त्यांना माझे स्वीय सहाय्यक पूर्ण वेळ मदत करतील, असे सांगून ही कामे तातडीने मार्गी लावण्याचे त्यांनी मान्य केले.