चालू वर्षी तुलनेने बऱ्यापैकी झालेला पाऊस, हिरवीगार वनराई व पाठोपाठ थंडीच्या वातावरणाने नांदूर मध्यमेश्वरचा परिसर निसर्ग सौंदर्याने बहरून गेला आहे, त्यातच देशी विदेशी पक्ष्यांचे तेथे आगमन झाले असून त्यांच्या किलबिलाटाने परिसर गजबजून गेला आहे.  देशी- विदेशी पक्षी पाहण्यांसाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे, मात्र यावर्षीपासून वनविभागांने पक्षी निरीक्षणासाठी ठराविक शुल्क आकारण्यांचा आदेश काढला आहे.     महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेला नांदूर मध्यमेश्वरच्या  पक्षी अभयारण्यांत सबेरिया, मध्य अफ्रिका, मध्य आशिया, मध्य युरोप, इराण या देशातून तसेच भारतातील मध्यप्रदेश, जम्मू काश्मिरचा काही भाग, लडाखचा, तिबेटचा परिसर, राजस्थानचा काही भाग व कच्छ परिसरातून दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन मोठया प्रमाणांवर होते.  डिसेंबरच्या महिन्यांत तर परदेशी पाहुण्या पक्षांनी नांदूर मध्यमेश्वरचा परिसर फुलून जातो.  त्यामुळे धरण परिसरात पक्षी निरीक्षणांसाठी पर्यटकांची मोठी गर्दी  होत आहे.नांदूरमध्यमेश्वरच्या परिसरात  हजारो प्रजातींचे पक्षी दरवर्षी स्थलांतर करीत येथे येतात त्यांची संख्या जवळपास १२ ते १३ हजारांच्या आसपास असते.  यंदा गेल्या दोन तीन वर्षांच्या तुलनेत पक्ष्यांचे प्रमाण तीस टक्क्यांनी वाढले आहे, असे पक्षी निरीक्षकांचे मत आहे.

निरीक्षण मनोऱ्यांची दुरवस्था
    या परिसरात पक्षी निरीक्षणांसाठी मनोरे उभारले आहेत मात्र काहींची दुरावस्था झाली आहे.  काही समस्याही आहेत.  त्या शासनांने सोडविण्यांची पर्यटकांची मागणी आहे.  काही वर्षांपूर्वी नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यांत पक्षी तज्ञ सलीम अली यांनी भेट दिली होती.  त्यांच्या निरीक्षणानंतर नांदूरमध्यमेश्वरची ख्याती दूरवर पसरली.  मागील काही वर्षांपूर्वी राजकीय वादात नांदूर मध्यमेश्वरचे पाणी पेटले त्यानंतर मध्यंतरी या धरणांतून पाणी सोडले गेले होते त्यामुळे पक्ष्यांचे अन्न स्त्रोत कमी झाल्यांने व धरणांची चाललेली दुरूस्ती तेथील यंत्रांचा खडखडाट व स्फोटामुळे आवाजांने पक्षांमध्ये भीतीची भावना निर्माण झाली त्यामुळे दोन वर्षांत पक्षी येण्यांचे प्रमाण कमी होते यंदा ते वाढल्याचा दावा करण्यांत येतो.