आई राजा उदो उदो.. सदा आनंदीचा उदो उदो..च्या गजरात तुळजाभवानीच्या चैत्री यात्रेत अडीच लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. उपस्थितीवर जवळपास ३० टक्के परिणाम झाल्याचे दिसून आले. तुळजाभवानीच्या चैत्री यात्रेसाठी गेल्या १५ दिवसांपासूून पुजारी व व्यापारी यांनी जय्यत तयारी सुरू होती. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असणारी यात्रेकरुंची गर्दी अचानक पौर्णिमेच्यादिवशी रोडावल्याचे चित्र होते. उन्हाच्या तीव्रतेचा फटका भवानी मंदिरात सर्वानाच सहन करावा लागत आहे. पायी चालत येणाऱ्या भाविकांचीही बुधवारी असणारी गर्दी गुरुवारी ओसरल्याचे दिसून आले. दुपारी बाराच्या दरम्यान बसस्थानक परिसरातही भाविकांची संख्या तुरळक जाणवत होती.
मध्यरात्रीनंतर एक वाजता तुळजाभवानीची घाट झाली, तेव्हा बुधवारी उशिरा लावलेल्या अभिषेक रांगेतील भाविकांच्या अभिषेकाला उत्साहात सुरुवात झाली. मंदिराखालील नवीन पुलापर्यत अभिषेकाच्या रांगा होत्या. मध्यरात्रीनंतर सुरू झालेले अभिषेक कोणताही अनुचित प्रकार न होता निर्विघ्न पार पडले. यासाठी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. पाळीचे पुजारी सोनेराव कदम यांनी हजारो भाविकांना कपाळी मळवट भरुन आशीर्वाद दिले. पुजारी विकास कदम, पुजारी सुधीर कदम यांनी दिलेल्या माहितीवरुन यात्रा अत्यंत कमी भरली आहे. गुरुवारी सकाळी देवीची नित्योपचार पुजा संपन्न झाली. महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, पुजारी सोनेराव कदम यांनी देवीची पुजा केली. त्यानंतर आरती होऊन अंगारा निघाला. दुपारी बारा वाजता निघालेला अंगारा घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, पालखी घेऊन बाहेरगावाहून वाजतगाजत येणाऱ्या भाविकांचे जथ्थे दिवसभर मंदिरामार्गावरुन जात होते. आराधी गाणी गात झांझ वाजवत भक्तीत दंग झालेल्या भाविकांचे चित्र तुळजाभवानीवरील श्रद्धेचे दर्शन घडविणारे होते.
दर्शन मंडपाचे चार मजले भाविकांनी खच्चून भरले होते. नव्याने बांधलेल्या दर्शन मंडपातील थंडाव्यामुळे भाविकांनी कडाकाच्या उन्हातही आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेतला. दीड तास अंतराने भाविकांना भवानीचे दर्शन घेता येत होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन कोणताही अनुचित प्रकाराची नोंद न होता यात्रा शांततेत पार पडत आहे. भाविकांना दर्शन सुखकर झाल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या असल्याने मंदिर प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला.
उपजिल्हाधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महाद्वारासमोर मोठा मंडप उभा करुन भाविकांना सावली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा मंडप कोणी टाकायचा, त्याचा खर्च कोणी करायचा हे निश्चित न झाल्याने मंडप टाकला गेला नाही. यात्रा काळात पाणपोईसाठी लागणारे पाणी कमी पडल्याच्या तक्रारी करण्यात आल्या असल्या, तरी नगरपरिषदेने बुधवार व गुरुवार या दोन दिवशी शहरात नळाबरोबरच टंॅकरव्दारे मुबलक पाणीपुरवठा केल्याने पुजारी वर्गाकडून पालिकेचे कौतुक करण्यात आले. नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे, मुख्याधिकारी डॉ. संतोष जिरगे यांनी प्रत्यक्ष शहरात फेरफ़टका मारून पाणी पुरवठय़ाचा आढावा घेतला. चैत्रीयात्रा वर्षभराचे अर्थकारण समतोल करणारी यात्रा मानली जाते. या यात्रेत कमाई करुन दुकानाचे अवाढव्य भाडे देण्याची येथे व्यापाऱ्यांची परंपरा आहे. कर्ज काढून ज्या व्यापाऱ्यांनंी दुकाने थाटली. त्यांचे मोठे नुकसान यातून झाले आहे. दरवर्षीच्या तुलनेने यंदा सुमारे ३० टक्के यात्रा कमी भरली. दुष्काळाचा हा परिणाम असल्याची चर्चा आहे. कमी यात्रेचा व्यावसायिक व व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला.