ठाण्यातील संगीत रसिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ऋतुरंग संस्थेचा ऋतुरंग महोत्सव शुक्रवार २५ व शनिवार २६ ऑक्टोबरदरम्यान ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे. आजच्या पिढीतील आघाडीचे कलाकार शौनक अभिषेकी, आनंद भाटे आणि भुवनेश कोमकली यांच्यासोबतच गायिका बेगम परवीन सुलताना आणि कौशिकी चक्रवर्ती यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
ठाण्यातील संगीत रसिकांनी आठ वर्षांपूर्वी एकत्र येऊन ऋतुरंग संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या वतीने शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचे १४ दर्जेदार कार्यक्रम ठाण्यात झाले असून रसिकांना नवनवीन आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम अनुभवता यावेत या उद्देशाने ही संस्था कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. २५ ऑक्टोबर रोजी त्रिदल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पं. जितेंद्र अभिषेकी, पं. भीमसेन जोशी आणि पं. कुमार गंधर्व या मान्यवरांची गायन परंपरा नव्या पिढीत जोपासणारे आजच्या पिढीचे कलाकार शौनक अभिषेकी, आनंद भाटे आणि भुवनेश कोमकली हे आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना अतुल दाते यांची आहे, तर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी परंपरा हा कार्यक्रम होणार आहे. जगविख्यात गायिका बेगम परवीन सुलताना आणि कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन या कार्यक्रमात होणार आहे. विनय मराठे यांची ही संकल्पना आहे.
ऋतुरंग महोत्सवामध्ये आत्तापर्यंत डॉ. प्रभा अत्रे, मालिनी राजूरकर, डॉ. अश्विनी भिडे देशपांडे, कलापिनी कोमकली, देवकी पंडित, अरुण दाते, श्रीधर फडके, अनुराधा पौडवाल, संजीव अभ्यंकर, जयतीर्थ मेवुंदी, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, मंजूषा कुलकर्णी पाटील, आरती अंकलीकर व जयतीर्थ मेवुंदी या दिग्गज कलाकारांनी आपली गाणी सादर केली आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क-रवी कदम – ९००४०९६९२३.