नाटय़ अभिवाचन आणि नाटय़ाविष्काराचे साक्षी होण्याची संधी मिळाल्यामुळे नाशिकरोडवासियांची एक सायंकाळ अधिकच आल्हाददायक होऊन गेली. त्यासाठी निमित्त ठरले येथील ऋतुरंग परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमांचे.
अंरंग नाशिक निर्मित ‘त्यांच्या दैनंदिनातील अधली मधली पाने’ हा प्रशांत हिरे यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेला अभिवाचनाचा प्रयोग झाला. त्यात श्रीकांत वाखारकर, पल्लवी पटवर्धन, लक्ष्मी पिंपळे, सुमीत जाधव यांनी सहभाग घेतला. विवाह झालेल्या जोडप्यांमधील प्रेम, जिव्हाळा, राग, लोभ, मत्सर, आवडनिवडमधील तफावत यातून निर्माण होणारी भावनिक गुंतागुंत, त्यातून होणारी सुखावह सोडवणूक व नात्याची केलेली जपवणूक, हा सर्व पट अतिशय सुरेल लयबध्द पध्दतीने रसिकांसमोर उलगडत गेला.
कुठेतरी, केव्हातरी, आपल्या स्वत:च्या आयुष्यातदेखील नात्यांमध्ये ताण-तणावाचे प्रसंग उद्भवले असले तरीही त्यातून विसंवाद न होता जरूर मार्ग निघू शकतो. पुन्हा एकदा आकाश निरभ्र होऊ शकते, याचा प्रत्यानुभव रसिकांनी घेतला.
या प्रयोगास भरभरून दाद मिळाली. यानंतर ऋतुरंग निर्मित चंद्रशेखर फणसळकर लिखीत आणि प्रशांत हिरे दिग्दर्शित ‘अनेस्थेशिया’ हा एकांक सादर करण्यात आला.
एका मनोरूग्णाच्या वेडाचे टप्पे दुसऱ्यासाठी किती जीवघेणे ठरू शकतात. त्यातून त्याच्याच कुटूंबातील सदस्यांची आहुती पडते. मनोरूग्णांच्या मानसिकतेचे विश्लेषण करून सांगणारा हा नाटय़ाविष्कार होता.
राजा पत्की यांनी मनोरूग्णाची अवस्था, त्याची तडफड, समाजात असूनही घराबाहेर न पडता येण्याची हतबलता प्रभावीपणे वठवली. अगदी रेखीव बांधणी आणि तरीही प्रभावीपणे विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यात दिग्दर्शकाचं कसब दिसून आले. त्यांना कीर्ती भवाळकर, संतोष जोशी यांची साथ मिळाली. अरविंद भवाळकर यांची प्रकाश योजना आणि गिरीश वागळे यांचे संगीत व ध्वनी संयोजन होते.