माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या नाशिक विभागाच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत ५.२९ टक्क्यांनी वाढ होऊन तो ८९.१५ टक्क्यांवर पोहोचला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही उत्तीर्णतेत मुलींनी आघाडी घेतली असून त्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.५८, तर मुलांचे ८५.२५ टक्के आहे. नाशिक विभागीय मंडळांतर्गत एक लाख ८६ हजार ५१० पैकी एक लाख ६६ हजार २६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालाचे वैशिष्टय़ म्हणजे, उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी तब्बल एक लाख ११ हजार ११५ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणी प्राप्त केली. ३० टक्क्यांपेक्षा कमी निकालाच्या शाळांच्या संख्येत लक्षणीय घट होऊन ती यंदा केवळ चारवर आली आहे. विभागातील ४५१ माध्यमिक शाळांचा १०० टक्के निकाल लागला.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिक विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. भ्रमणध्वनीवरदेखील निकाल पाहण्याची व्यवस्था केली गेली होती. शहर व ग्रामीण भागांतील सायबर कॅफेवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांची झुंबड उडाली. यामुळे सायबर कॅफेचालकांनी एक निकाल पाहणे व त्याची प्रत काढून देण्यासाठी २० ते २५ रुपये घेऊन आपले उखळ पांढरे करून घेतले. विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका २६ जून रोजी दुपारी तीन वाजता आपल्या शाळेमार्फत दिली जाणार आहे. विभागाच्या निकालात नाशिक जिल्हा (९०.६१) आघाडीवर, तर जळगाव जिल्हा (८७.४४) पिछाडीवर राहिला. धुळे जिल्ह्याचा (८८.२२), तर नंदुरबारचा (८९.१०) टक्के निकाल लागला. नाशिकमध्ये ८४,०७६ पैकी ७६,१८१, धुळे २६,९०२ पैकी २३,७३२, जळगाव ५६,८२७ पैकी ४९,६८९, तर नंदुरबार जिल्ह्य़ात १८,७०५ पैकी १६,६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
गतवेळप्रमाणे यंदाही मुलींनी उत्तीर्णतेत आघाडी घेतली. विभागात एकूण ८१,८५० विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली.
त्यातील ७४,९५८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या, तर ९१,३११ प्रविष्ट झालेल्या मुलांपैकी ८१,८५० जण उत्तीर्ण झाले. विशेष प्रावीण्य गटात ३९३७०, प्रथम श्रेणी ७१७४५, द्वितीय श्रेणी ४७८०९, तर ७३४५ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यावर विहित शुल्कासह ५ जुलै २०१४ पर्यंत मंडळाकडे अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व विषय उत्तीर्ण झालेल्यांना श्रेणी सुधार योजनेंतर्गत पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध आहे. ऑक्टोबर २०१४ व मार्च २०१५ अशा दोन संधी त्यांना उपलब्ध राहतील. परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास उत्तरपत्रिकेची छायाप्रत उपलब्ध करून दिली जाईल. ऑनलाइन निकालानंतर ७ जुलै २०१४ पर्यंत त्यासाठी अर्ज सादर करता येईल, असे मंडळाने म्हटले आहे.

माध्यमिक शाळांच्या गुणवत्तेत वाढ
दहावीच्या निकालात यंदा विभागातील ४५१ माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला. गत वर्षी असा निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या २९५ होती, तर २०१२ मध्ये हेच प्रमाण २३१ शाळा इतके होते. निकाल उंचाविण्यासाठी चाललेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे माध्यमिक शाळांच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली.

कमी निकालाच्या शाळांच्या संख्येत घट
३० टक्क्यांपेक्षा कमी निकालाच्या शाळांची संख्या यंदाच्या निकालात झपाटय़ाने कमी झाली आहे. मागील वर्षी शून्य निकालाच्या तीन, एक ते १० टक्के निकालाच्या तीन, दहा ते २० टक्के निकालाच्या सात आणि २० ते ३० टक्के निकालाच्या १२ अशा एकूण २५ शाळांचे निकाल ३० टक्क्यांपेक्षा कमी होते. या वर्षी ही संख्या जेमतेम चार इतकी आहे. त्यातही या शाळा १० ते २० आणि २० ते २० टक्के निकालाच्या गटात समाविष्ट आहेत. २०१२ मध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या शाळांची संख्या १३७ इतकी होती. त्याची तुलना केल्यास शाळांचा निकाल वाढविण्यात यश मिळाल्याचे लक्षात येते.

९६ कॉपीबहाद्दरांना शिक्षा
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत
एकूण १४६ विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला. त्यापैकी ९६ विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यात आली आहे. त्यात नाशिकचे सहा, धुळे २२, जळगाव ६५ व नंदुरबारच्या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.