राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात अमरावती विभगाने गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांची सुधारणा घडवून आणली असली तरी, विभागाची राज्यात सातव्या स्थानी घसरण झाली आहे. अमरावती विभागाचा निकाल ८४.११ टक्के लागला आहे. अमरावती विभागातून १ लाख ६४ हजार १०३ नियमित विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३८ हजार २३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही टक्केवारीत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.९४, तर मुलांचे ८१.६५ टक्के आहे.
गेल्या वर्षी अमरावती विभागाचा निकाल ७४.६० टक्के लागला होता. निकालाच्या टक्केवारीत सुधारणा झाली आहे, पण नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभागाचे स्थान सातवे आहे. या विभागात गेल्या वर्षीच्या निकालात बुलढाणा जिल्हा व यंदा वाशीम जिल्ह्य़ाने बाजी मारली आहे. वाशीमचा निकाल ८८.०१ टक्के आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार या विभागातून २८ हजार ३७ विद्यार्थ्यांपैकी केवळ ५ हजार ५१२ म्हणजे १९.६६ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. शंभर टक्के निकाल असणाऱ्या विभागातील शाळांची संख्या २४७ आहे. विभागात एकूण २ हजार ४१९ शाळा आहेत. ९० ते ९९ टक्क्यांपर्यंत ८१२ शाळा पोहोचू शकल्या.
दोन शाळांना तर भोपळा देखील फोडता आलेला नाही. अमरावती विभागात कॉपीची ११८ प्रकरणे निदर्शनास आली. विभागात एकूण ७२७ परीक्षा केंद्रांवरून परीक्षा घेण्यात आली. ९० परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण करण्यात आले. ३२ केंद्रांवर भरारी पथकांनी भेटी दिल्या.