शेतक-यांच्या आग्रहाखातर आपण आगामी लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार म्हणून उभे राहणार आहोत. आपली उमेदवारी निश्चित झाली असून, खासदार राजू शेट्टी यांचा ‘एक नोट, एक व्होट’ हाच पॅटर्न आपण राबविणार आहोत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी माढा लोकसभेसाठी सदाभाऊ खोत यांची उमेदवारी नुकतीच जाहीर केली आहे. या पाश्र्वभूमीवर खोत यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये जाऊन शेतकरी व कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू केला आहे. याअंतर्गत सांगोला तालुक्यातही त्यांनी विविध गावांतून शेतक-यांच्या भेटीगाठी घेतल्या त्या वेळी त्यांनी ही ‘एक नोट, एक व्होट’ संकल्पनेची घोषणा केली.
खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारावेळी ही ‘एक नोट, एक व्होट’ पद्धत राबविली होती. यामध्ये प्रत्येक मतदाराने शेट्टी यांच्या प्रचारासाठी एक रुपया तसेच एक मत गोळा केले होते. याचाच धागा पकडत खोत यांनीही आपण माढा मतदारसंघात ही पद्धत वापरणार असल्याचे सांगितले.
माढय़ाचे खासदार, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची भूमिका कायम ठेवल्याने माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँगेस, भाजप-सेना, रिपाइं महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सदाभाऊ खोत यांची उमेदवारी निश्चित करून निवडणुकीची तयारीही वेगाने हाती घेतल्यामुळे या मतदारसंघातील साखरपट्टय़ामध्ये हा चच्रेचा विषय ठरला आहे.
मागील दोन वष्रे दुष्काळाचे चटके सोसत असतानाच गतवर्षी ऊसगळीत हंगामात ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्हय़ात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची झळ बऱ्याच साखर कारखान्यांना बसली होती. त्यानंतर आता पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदाच्या गळीत हंगामात ऊसदरासाठी आंदोलनाची ठिणगी टाकली आहे. हे आंदोलन एकीकडे पेटत चालले असताना दुसरीकडे आगामी माढा लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सदाभाऊ खोत यांची उमेदवारी पुढे आणली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आतापासूनच राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे.