फारशी शैक्षणिक पाश्र्वभूमी नसूनही गेल्या तब्बल चार दशकांहून अधिक काळ निरनिराळ्या ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन तेथील भौगोलिक आणि ऐतिहासिक माहात्म्य वाचकांपुढे ठेवणारे लोकसत्ता परिवारातील लेखक सदाशिव टेटविलकर यांचा ‘इंद्रधनु’तर्फे वार्षिक रंगोत्सवात ठाणे मानबिंदू पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
 ठाणे जिल्ह्य़ात एकूण ३७ किल्ले असल्याची नोंद आहे. मात्र सदाशिव टेटविलकर यांनी केलेल्या भटकंतीत जिल्ह्य़ात प्रत्यक्षात ५५ किल्ले असल्याचे सप्रमाण सिद्ध केले. वाळू माफियांनी डोंगरातून दगड काढण्याच्या नादात ठाण्याच्या खाडीकिनारी असलेल्या नागला बंदर येथील नागला कोट उद्ध्वस्त केला. टेटविलकरांनी ही बाब उघडकीस आणली. शिलाहारकालीन स्थापत्य, वीरगळ, गड आणि किल्ल्यांशी निगडित असलेला महाराष्ट्राचा इतिहास हे त्यांचे अभ्यासविषय आहेत. भिवंडी तालुक्यात कारिवली गावात अवशेष रूपाने शिलाहारकालीन मंदिर अस्तित्वात असल्याचे त्यांनीच प्रथम निदर्शनास आणून दिले. ‘दै. लोकसत्ता’मध्ये गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ लेखन करणाऱ्या टेटविलकरांची दुर्गयात्री, दुर्गसंपदा-ठाण्याची, विखुरल्या इतिहास खुणा, ठाणे किल्ला आणि गड-किल्ल्यांच्या जावे गावा ही पुस्तके प्रसिद्ध असून लवकरच दुर्ग लेणी दिव-दमण-गोव्याची हे त्यांचे नवे पुस्तक प्रकाशित होणार आहे.