News Flash

सागर मेघे व चारूलता टोकस यांचा दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे जोरदार आक्षेप

पक्षांतर्गत निवडणुकीतून आगामी लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरविण्याच्या पथदर्शी योजनेअंतर्गत आता वर्धा मतदारसंघाची निवड झाल्याने कांॅग्रेसचे इच्छूक उमेदवार सागर मेघे व चारूलता टोकस यांनी यावर दिल्लीतील

| February 21, 2014 02:45 am

पक्षांतर्गत निवडणुकीतून आगामी लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरविण्याच्या पथदर्शी योजनेअंतर्गत आता वर्धा मतदारसंघाची निवड झाल्याने कांॅग्रेसचे इच्छूक उमेदवार सागर मेघे व चारूलता टोकस यांनी यावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे जोरदार आक्षेप नोंदविले आहेत.
कांॅग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी देशभरातील १६ लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार पक्षांतर्गत निवडणुकीतून निवडण्याचे ठरविले आहे. यात पूर्वी यवतमाळ व औरंगाबाद मतदारसंघाची निवड करण्यात आली होती. आता त्याऐवजी वर्धा व लातूर, असा बदल करण्यात आला आहे. मात्र, हा बदल प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या सोयीने झाल्याची भावना मेघे-टोकस गटात पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार या प्रयोगासाठी वर्धेची निवड करू नये, असे साकडे खासदार दत्ता मेघे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांना दिल्लीत भेटून घातले. दुसऱ्या इच्छूक चारूलता टोकस यांचा मोर्चा सांभाळणारे राज्यमंत्री रणजित कांबळे यांनीही याविषयी आक्षेप घेतल्याचे समजले. कुठल्याही योजना किंवा कार्यक्रमासाठी वर्धेचीच निवड का, असा या दोघांचाही आक्षेप आहे. मात्र, आक्षेप नोंदवितांना आगामी मार्चमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांची सबब पुढे करण्यात आली आहे. या महिन्यात जिल्ह्य़ातील ५५० ग्रामपंचायतींपैकी ३५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून त्याची आचारसंहिताही लागू झाली आहे. या काळात सरपंच व अन्य प्रतिनिधींना कसे भेटणार? सरपंच की माजी सरपंच, असा घोळ आहेच.
आचारसंहितेमुळे पक्षचिन्हाच्या गाडय़ा किंवा अन्य प्रचारसाहित्य दाखविता येणार नाही. या निवडणुका पक्षचिन्हावर होत नसल्याने प्रत्येक सरपंच आपल्याकडेच असावा, यासाठी चढाओढ लागेल. अशा व अन्य कटकटींचा पाढा पक्षप्रभारी मोहन प्रकाश यांच्याकडे वाचण्यात आला. वर्धेची निवड प्रयोगासाठी होऊ नये म्हणून दोन्ही गट प्रयत्नशील असले तरी प्रयोग झालाच तर आवश्यक ती तयारी ठेवण्याच्या तयारीत दोन्ही गट असल्याचे दिसून आले. मेघे-टोकस या दोन्ही गटांना पक्षांतर्गत निवडणुकीत विजयी होण्याची खात्री वाटते. टोकस-कांबळे गटाकडे बहुतांश जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तसेच जिल्हा कांॅग्रेस समिती आहे, पण मेघे गटाने आजच आपल्याकडे ५०० वर संभाव्य पक्षीय मतदारांची यादी असल्याचा दावा केला. सेवादल, एन.एस.यु.आय व युवक कांॅग्रेस, तसेच आर्वी, वर्धा, सेलू, हिंगणघाट ब्लॉकचे पदाधिकारी पाठिशी असल्याचे मेघे गटाने स्पष्ट केले. पक्षांतर्गत निवडणुकीत जिल्ह्य़ातील पक्ष पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व नगरसेवक हे मतदार राहतील, तसेच तटस्थ किंवा कांॅग्रेस विचारसरणीचे वकील, डॉक्टर, सनदी लेखापाल, समाजसेवी यांनाही मतदानाचा अधिकार आहे. एका लोकसभा क्षेत्रात ७००-८०० मतदार संख्येचे मंडळ उमेदवार निवडतील. यादृष्टीने आक्षेप नोंदवितांनाच मतदार हेरण्याचेही कार्य उभय गोटातून आरंभिल्याचे चित्र पुढे आले आहे.
अ.भा. महिला काँग्रेसच्या सचिवपदी चारूलता टोकस
चारूलता टोकस यांची निवड अखिल भारतीय महिला कांॅग्रेसच्या सचिवपदी झाल्याने टोकस विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कांॅग्रेसचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली असून महाराष्ट्रातून टोकस यांचीच वर्णी लागली आहे. टोकस यांच्याखेरीज छत्तीसगड, गुजरात, अरुणाचल प्रदेश, राजस्थान व गोवा येथील महिला नेत्यांची वर्णी राष्ट्रीय कार्यकारिणीवर लागली आहे. राष्ट्रीय पाच पदाधिकाऱ्यांसह पाच राज्यांच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्ष व सात विभागीय अध्यक्षांच्या नियुक्त्यांना पक्षाध्यक्ष सोनिया गांधींनी हिरवा कंदील दिल्याचे जनार्दन द्विवेदी यांनी एका पत्रकातून नमूद केले. प्रथम या सर्व नियुक्त्यांबाबत पक्षाच्या विविध शाखांची जबाबदारी सांभाळणारे पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आढावा घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. दोन महिन्यापूर्वी सेवाग्रामला चारूलता टोकस यांनी प्रदेश महिला मेळाव्याचे यशस्वी आयोजन करून पाहुण्या म्हणून उपस्थित महिला कांॅग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष  प्रभा ओझा यांच्यासह सर्वांचे लक्ष वेधले होते. टोकस या संदर्भात बोलतांना म्हणाल्या, तीन महिन्यापूर्वी खासदार राहुल गांधी यांनी काही महिला नेत्यांच्या मुलाखती घेतल्या त्यात आपलाही समावेश होता, पण राष्ट्रीय पातळीवर पक्षाची जबाबदारी सोपविण्यासाठी मुलाखत झाल्याचे वाटले नव्हते. ही जबाबदारी पार पाडतांना कांॅग्रेससोबत युवतींना मोठय़ा प्रमाणात जोडण्यावर आपण भर देऊ, असे त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 2:45 am

Web Title: sagar meghe charushila tokas clash for lok sabha seat
Next Stories
1 गोंदिया जिल्ह्यतील आमगावात बिबटय़ाच्या कातडीसह दोघांना अटक
2 अतिवृष्टीग्रस्तांना अजूनही मदत नाही
3 ‘सहधारक’ कोण?
Just Now!
X