27 September 2020

News Flash

अभ्यासिकांसाठी आता साहित्य अकादमी सरसावली

मुंबई शहरात जागेची अडचण नेहमीच सतावत असते. कुटुंब मोठे आणि घर लहान या कारणामुळे किंवा परिस्थितीमुळे अभ्यासासाठी वेगळी खोली उपलब्ध न झाल्याने अनेकजण अभ्यास करण्यासाठी

| June 27, 2013 03:49 am

मुंबई शहरात जागेची अडचण नेहमीच सतावत असते. कुटुंब मोठे आणि घर लहान या कारणामुळे किंवा परिस्थितीमुळे अभ्यासासाठी वेगळी खोली उपलब्ध न झाल्याने अनेकजण अभ्यास करण्यासाठी पदपथ किंवा सार्वजनिक उद्यानांचा आधार घेत असतात. मुंबईतील काही पदपथ, उद्याने आणि गल्ल्या या अभ्यास केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. शिकण्याची व अभ्यास करण्याची जिद्द आहे पण जागेअभावी अभ्यास वाचन आणि संशोधन करता येऊ शकत नाही, अशा अनेक जणांसाठी आता ‘साहित्य अकादमी’ने मदतीचा हात पुढे केला आहे. साहित्य अकादमीच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाने अभ्यासिका विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.
दादर (पूर्व) येथे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इमारतीमध्ये तळघरात असलेल्या साहित्य अकादमीच्या जागेत ही अभ्यासिका तयार करण्यात आली आहे. एका वेळेस २० ते २५ जण या अभ्यासिकेचा लाभ घेऊ शकतील. साहित्य अकादमी ही केंद्र शासनाची संस्था असून २४ भारतीय भाषांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके साहित्य अकादमी प्रकाशित करत असते. या अभ्यासिकेत येणाऱ्यांना साहित्य अकादमीने प्रकाशित केलेले दुर्मिळ ग्रंथ वाचन, अभ्यास आणि संदर्भ टिपून घेण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. साहित्य अकादमीच्या मुंबई कार्यालयाचे प्रमुख कृष्णा किंबहुने यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाविषयी ‘वृत्तान्त’ला अधिक माहिती देताना साहित्य अकादमीच्या पुस्तक विक्री आणि प्रदर्शन विभागातील सहाय्यक प्रकाश पाटील यांनी सांगितले की, या अभ्यासिकेत साहित्य अकादमीच्या पुस्तकांबरोबरच मराठी विश्वकोश, मराठी व इंग्रजीतील काही प्रमुख वृत्तपत्रे, साहित्य अकादमीची पुरस्कारप्राप्त पुस्तके, मराठी साहित्य आणि ग्रंथ व्यवहारासाठी उपयुक्त असलेली ‘ललित’, ‘साहित्यसूची’ ही मराठीतील मासिके तसेच कोकणी, गुजराथी, सिंधी भाषेतील अन्य मासिकेही उपलब्ध असतील. लेखक, संशोधक, पदव्यूत्तर शिक्षण घेणारे, ‘पीएचडी’ करणारे विद्यार्थी, अभ्यासक या सेवेचा लाभ घेऊ शकतील.
अभ्यासिकेची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी असून येथे येऊन अभ्यासिकेत उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा लाभ घेता येईल. वाचनाबरोबरच ज्यांना पुस्तके, मासिके यातील काही संदर्भ, माहिती हवी असेल त्यांना ती यथे बसून ती लिहून घेता येईल. येथील पुस्तके घरी घेऊन जाता येणार नाहीत. साहित्य अकादमीने सुरू केलेल्या या सेवेचा फायदा जास्तीत जास्त अभ्यासक, संशोधक आणि लेखकांनी घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ०२२-२४१३५७४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 3:49 am

Web Title: sahitya akademi comes forward for study rooms
Next Stories
1 अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स प्रवेश प्रक्रिया सुरू
2 मालेगावच्या चित्रपटाची देशभरारी!
3 शुक्रवारी ‘गझल सुफियाना’
Just Now!
X