सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात ५० किलोच्या ९ लाख ५० हजार साखर पोत्यांचे आजवर उत्पादन केले असून, साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
बाळासाहेब पाटील म्हणाले, की या हंगामासाठी एकूण १९१४१.८९ हेक्टर क्षेत्रामधील उसाची नोंद कारखान्याकडे गळितासाठी झालेली आहे. आजअखेर ४ लाख १७ हजार ९५० मेट्रीक टन उसाचे गळीत झाले असून, ५० किलोच्या क्षमतेच्या ९ लाख ५० हजार साखर पोत्यांची निर्मिती झालेली आहे. सरासरी साखर उतारा ११.५० टक्के मिळालेला आहे. गेल्या दोन हंगामापेक्षा हेक्टरी टनेजमध्ये ८ ते ९ मेट्रीक टनांनी वाढ झालेली आहे.
कारखाना प्रतिवर्षी नोंदलेले क्षेत्र, उसाचे वाण, लागण, खोडव्याच्या तारखा या आधारे दैनंदिन गळीत क्षमतेस पुरेल अशा प्रकारे उस तोडणीचा प्रोग्रॅम वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट, पुणे यांच्याकडून तयार करून घेऊन कार्यरत आहे. या तोडणी प्रोगॅ्रमनुसार संपूर्ण व्यवस्थापनाचा संकल्प आहे. कारखाना डिस्टीलरीमध्ये आजपर्यंत २९ लाख ५८ हजार ८३४ लिटर्स रेक्टीफाइड स्पिरीट व ८ लाख २४ हजार २०७ लिटर्स ई.एन.ए. चे उत्पादन झालेले आहे. प्रतिवर्षांप्रमाणे कंपोष्ट खत सह्याद्री समृद्ध सेंद्रिय खत, रासायनिक खत, उस बियाणे आदी सुविधा उस उत्पादकांना पुरविण्यात येत आहेत.
साखर पोती पूजनप्रसंगी उपाध्यक्ष बबनराव यादव, संचालक संजय जगदाळे, मानसिंगराव जगदाळे, लालासाहेब पाटील, दत्तात्रय जाधव, प्रा. भानुदास भोसले, विठ्ठलराव घोरपडे, संजय कदम, विष्णूपंत गोरे, सुरेशराव माने, किशोर पाटील, निर्मला चव्हाण, कार्यकारी संचालक सी. एन. अहिरे, अधिकारी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते.