दूरदर्शन ‘सह्य़ाद्री’नवरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दूरदर्शन वृत्तान्ताचे प्रसारण १ मे रोजी दुपारी साडेचार वाजता ‘सह्य़ाद्री’ वाहिनीवरून करण्यात येणार आहे. गेली १२ वर्षे ‘सह्य़ाद्री’ वाहिनीतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा ‘नवरत्न’पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे.
यंदाचा नवरत्न गौरव पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच दूरदर्शनच्या प्रांगणात आयोजिला होता. राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते या नवरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यंदाच्या मानकऱ्यांमध्ये भीमराव पांचाळ (स्वररत्न), डॉ. जब्बार पटेल (स्वररत्न), लालन सारंग (नाटय़रत्न), बाळासाहेब (वसंत) पित्रे व विमला पित्रे (वैभवरत्न), फरिदा लांबे (सेवारत्न), प्रकाश बाळ (रत्नदर्पण), विद्या बाळ (शारदा रत्न) वसंत सरवटे (कला रत्न), प्रतिमा इंगोले (साहित्य रत्न), केतकी माटेगावकर (विशेष सन्मान/नवीन चेहरा) यांचा समावेश होता. याच कार्यक्रमात नूतन परब, मंगेश जाधव, तिरथसिंह अरोरा या अंध व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास ‘प्रसार भारती’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार, दूरदर्शनचे महासंचालक त्रिपुरारी शरण, अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते परिक्षित सहानी, जितेंद्र, गोविंदा, डॉ. बी. के. गोयल, सिद्धार्थ काक आदी उपस्थित होते.  सुबोध भावे व विभावरी प्रधान यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यंदाच्या ‘नवरत्न पुरस्कार’ मानकऱ्यांची निवड माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. अरुण टिकेकर, रोहिणी हट्टंगडी, मीनल मोहाडीकर, रजिया पटेल यांच्या निवड समितीने केली.वाहिनीचे संचालक मुकेश शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.