सेंट फ्रान्सिस स्कूलने केलेली बेकायदेशीर शुल्कवाढ रद्द करावी, तसेच शुल्क भरले नाही या कारणावरून निकाल रोखून धरणे व इतर प्रकारे पालक व विद्यार्थ्यांवर दबाव आणू नये, असे निर्देश महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांनी दिले आहेत. या शाळेत शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर शिक्षकांनी तपासले नाही आणि संबंधितांना परीक्षेचा निकाल देण्याचे नाकारल्याची तक्रार पालक व शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचने केल्यानंतर प्रशासनाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळेत भेट देऊन हे निर्देश दिले.
शुल्कवाढीच्या मुद्दय़ावरून सेंट फ्रान्सिस स्कूल व्यवस्थापन आणि पालक यांच्यात वाद सुरू आहे. स्कूलने वाढीव शुल्क रद्द करावे असे आधीच सूचित केले गेले आहे. उभयतांमधील वादाने पुन्हा वेगळे वळण घेतले. ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही, त्यांचे पेपर तपासले गेले नाही. इतकेच नव्हे तर, त्यांचे परीक्षांचे निकाल देण्याचे नाकारण्यात आले. या संदर्भात पालक व मंचने प्रशासनाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या पाश्र्वभूमीवर, कुंवर यांनी स्कूलला भेट दिली. शैक्षणिक शुल्क निश्चित करताना शासनाच्या तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. त्या नुसार कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा, असे त्यांनी सूचित केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक व शैक्षणिक अहवाल विद्यार्थी व पालकांना पाहण्यासाठी उपलब्ध करावेत. पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरले नाही या कारणास्तव प्रगतिपुस्तक अथवा शैक्षणिक अहवाल दाखविण्यास प्रतिबंध करू नये, असे कुंवर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सेंट फ्रान्सिस शाळेच्या पालकांनी योग्य ते पुरावे सादर करून तक्रार करूनही तसेच पोलिसांकडे तक्रार देऊन दोन महिने उलटूनही शिक्षण खात्याने शाळेवर कोणतीही कारवाई केली नसल्याची तक्रार शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचने केली आहे.