प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या राजकारणात कर्मचारी पस्तावले
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन उपक्रमातील ५४६ कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचे वेतन आता फेब्रुवारी महिना संपत आला तरी मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परिवहन उपक्रमाची अनुदानाची नस्ती प्रशासनाने निर्णयाविना अडवून ठेवल्याने वेतन थकले असल्याचे परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
पालिका प्रशासनातील एक उच्च अधिकारी आणि परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक सुधीर राऊत हे एकाच शासकीय संवर्गातील आहेत. राऊत हे आयुक्तपदासाठीही प्रयत्नशील असल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून समजते. त्यामुळे पालिका प्रशासनातील एक अधिकारी राऊत यांना ‘पाण्यात’ पाहात असल्याचे सांगण्यात येते. हे राजकारण या थकलेल्या वेतनामागे असल्याचे सांगण्यात येते.
परिवहन उपक्रम उत्पन्न वाढवीत नाही. मग वेतन कशाला अशी एक नकारात्मक भूमिका पालिका प्रशासनाने करून घेतली आहे.
त्याचा राग पगाराच्या माध्यमातून परिवहन विभागातील चालक, वाहक व अन्य कर्मचाऱ्यांवर काढण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरमहा ९० लाख रुपयांची तरतूद असते. या अनुदानाची फाइल प्रशासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. परिवहन कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन दिले जाते. आता यापुढच्या दोन तारखा देऊनही वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांनी रागापोटी सुट्टय़ा टाकणे, अन्यत्र कामाला जाणे असे प्रकार सुरू केले असल्याचे सांगण्यात  येते.
श्रीमलंग गडाची यात्रा आता सुरू होणार आहे. उपक्रमाला या यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न या आठवडाभरात मिळते. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले नाही तर कर्मचारी हेतुपुरस्सर गैरहजर राहून उपक्रमाचे आर्थिक नुकसान करतील, अशी भीती सूत्राने व्यक्त केली.
सर्वच परिवहन उपक्रम तोटय़ात आहेत. मग केडीएमटी उपक्रमावर प्रशासन राग का काढीत आहे. उपक्रमाच्या ताफ्यातील १४५ पैकी ६० बस भंगारात गेल्या आहेत. २० बस दुरुस्तीसाठी बंद असतात. १५ बस तांत्रिक कारणाने बंद असतात. अशा परिस्थितीत ६० ते ६५ बस रोज प्रवासी वाहतूक करून अपेक्षित उत्पन्न मिळवितात, असे उपक्रमातील सूत्राने सांगितले.
परिवहन सभापती, सदस्य उपक्रमातील भंगार, इंधन, इंजिन घोटाळे शोधण्यात मश्गुल असल्याने त्यांना उपक्रमाचा नफा-तोटा याविषयी काही देणेघेणे नसल्याचे सांगण्यात येते. भाजपचे सभापती अशोक गोडबोले हे तरी वर्षभरात उपक्रमाला शिस्त लावतील अशी कर्मचारी, जाणकार नागरिकांची अपेक्षा होती. तेही अपयशी ठरल्याची टीका केली जात आहे. याबाबत परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते अद्याप आले नाहीत असे उत्तर देण्यात आले.