सिडकोच्या वतीने खारघर येथे आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ व अल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱ्या ३ हजार ५९० घरांच्या संकुलाला राज्य पर्यावरण विभागाने हिरवा कंदील दिल्याने या घरांच्या बांधकामाला सुरुवात झाली असून पुढील महिन्यात या घरांची अर्जविक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटकासाठी या घरांची किंमत पंचवीस लाखांच्या घरात राहणार आहे. सिडकोच्या वतीने दर वर्षी सहा हजार घरे बांधण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. 

गेली ४० वर्षे छोटी घरे उभारणीकडे दुर्लक्ष केलेल्या सिडकोने आता खारघर, तळोजा, घणसोली या नोडमध्ये बारा हजार घरे बांधण्याचे ठरविले आहे. त्यासाठी लागणारी जमीन आणि आराखडा तयार करण्याचे काम सिडकोचा नियोजन विभाग करीत आहे. खारघर सेक्टर ३६ येथे सिडकोला अशी जमीन उपलब्ध झाली असून त्या ठिकाणी पाच हजार घरांचे काम सध्या जोरात सुरू आहे. त्यातील एक हजार २४४ घरांची नुकतीच सोडत काढण्यात आली. मध्यम व उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी बांधण्यात आलेल्या या घरांमध्ये खासगी बिल्डर देत असलेल्या सर्व आलिशान सुविधा असल्याने त्यांची किंमत एक कोटीच्या वर गेलेली आहे. त्यामुळे या घरांना म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने अडीचशे घरे शिल्लक राहिली आहेत. विविध आरक्षणांतील शिल्लक घरांसाठी सिडकोला पुन्हा सोडत काढावी लागणार आहे.
मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी गृहसंकुलाची उभारणी केल्यानंतर याच संकुलाच्या जवळ आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ आणि अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी ३ हजार ५९० घरांची निर्मिती सिडको करीत आहे. यातील ९६८ घरे ही केवळ आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटकांसाठी आहेत. सिडको प्रारंभीच्या काळात अशा घटकांसाठी हडकोकडून कर्ज देऊन घरे देत होती. त्यामुळे झोपडय़ांचे प्रमाण आटोक्यात राहिले होते मात्र गेल्या ४० वर्षांत अशा घरांची निर्मिती बोटावर मोजण्याइतपत झाल्याने नवी मुंबईत झोपडय़ांचे पेव फुटल्याचे दिसून येते. आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटकासाठी ९६८ घरे दिल्यानंतर शिल्लक राहणारी दोन हजार ६२२ घरे ही अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी दिली जाणार आहेत.
नवी मुंबईत मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने खासगी बिल्डरांचे फावले आहे. सिडकोने अशा घरांची उभारणी हाती घेतली आणि पर्यावरण विभागाने नोटीस ठोकली. इतक्या मोठय़ा प्रमाणात घरांची निर्मिती होत असल्याने त्याला लागणारा एकत्रित सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात यावी असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले होते. सिडको संपूर्ण विभागासाठी सेक्टर १७ येथे एकच मोठा सीईटीपी प्रकल्प बांधत असल्याने अशा संकुलासाठी वेगळ्या सीईटीपीची गरज नाही असे सिडकोच्या वतीने कळविण्यात आले. तरीही पर्यावरण विभागाचे समाधान न झाल्याने या संकुलाच्या उभारणीला विलंब झाला. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी पर्यावरण विभागाला ही बाब पटवून दिल्यानंतर मागील महिन्यात या प्रकल्पाला पर्यावरण विभागाने हिरवा कंदील दिला असून कामाला सुरुवात झाली आहे.
जवळच व्हॅलिशिल्पचे काम करणाऱ्या बी. जी. शिर्के कंपनीला रीतसर निविदेद्वारे हे काम देण्यात आले आहे. या संकुलाच्या बांधकामाला आता सुरुवात झाल्याने पुढील महिन्यात या घरांसाठी अर्जविक्री सुरू केली जाणार आहे. सिडकोचे पणन व्यवस्थापक विवेक मराठे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. लोकसभा निवडणूक आणि तिची आचारसंहिता संपल्यानंतर सिडको संचालक मंडळाची बैठक होणार असून त्यात या घरांच्या किमतींना मंजुरी मिळणार आहे. सिडकोच्या अर्थ विभागाने या किमती ठरविण्याचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. सिडकोने अद्याप या घरांच्या किमती जाहीर केल्या नसल्या तरी त्यांच्या किमती १९ लाख ते २६ लाख रुपयांच्या घरात राहण्याची शक्यता सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी तीन महिन्यांपूर्वी व्यक्त केली आहे.