विक्रीकर विभागातील बढत्या आणि बदल्यांमधील भ्रष्टाचाराची तक्रार वित्त विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली म्हणून विक्रीकर निरीक्षक वसंत उटीकर यांच्या मागे विभागीय चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. मात्र या चौकशीचा अहवाल एक वर्षांच्या आत देण्याचा शासनाचा नियम असूनही अद्याप या संदर्भातील अहवाल देण्यात आला नसून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
माझगाव येथील विक्रीकर कार्यालयात असलेल्या निरीक्षक वसंत उटीकर यांनी २००७ मध्ये बदली करण्यात आलेल्या तिघा कर्मचाऱ्यांसंदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. हे तीनही अधिकारी बदली झाल्यावरही मुंबई कार्यालयातच कामावर हजर होत होते. याबाबत उटीकर यांनी २०१० मध्ये तक्रार केली. तथापि, त्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्यावर असलेल्या वरदहस्ताची चौकशी करण्याऐवजी उटीकर यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली.विभागीय चौकशीचा अहवाल एका वर्षांत देणे आवश्यक असल्याचे शासनाच्या नियमात म्हटले आहे. तथापि, २०१२ या वर्षांचे आठ महिने उलटून गेले तरी या चौकशीचा अहवाल देण्यात आलेला नाहीच पण उटीकर यांचाच मानसिक छळ सुरू करण्यात आल्याचे उटीकर यांचे म्हणणे आहे. आपली विभागीय चौकशी करणाऱ्या मात्र अहवाल सादर न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी उटीकर यांनी प्रधान सचिवांकडे केली आहे.