क्रिकेटमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्यातील दम-खम दाखविण्याची संधी मिळाल्याने भर मध्यान्हीच्या उन्हात जीव तोडून गोलंदाजी टाकणारे ग्रामीण भागातील गोलंदाज आणि आपल्या अनुभवी नजरेने त्यांच्यातील कौशल्य, वेग आणि राकटपणा हेरणारे माजी मध्यमगती गोलंदाज पांडुरंग साळगावकर. हे दृश्य होते येथील अनंत कान्हेरे मैदानावरील.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने वेगवान गोलंदाज घडविण्यासाठी आयोजित शोध मोहिमेचा दुसरा टप्पा रविवारी आणि सोमवारी पार पडला. पहिल्या टप्प्यात जिल्हा संघटनेच्या वतीने थेट तालुकास्तरावर चाचणी घेऊन सुमारे १४८ खेळाडूंची निवड नाशिक येथे होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यासाठी करण्यात आली. त्यात नाशिक शहरातील काही खेळाडूंची भर पडून ही संख्या पावणेदोनशेच्या आसपास गेली. साळगावकर यांच्या उपस्थितीत या खेळाडूंना आपल्यातील वेगाचे दर्शन घडविण्याची संधी उपलब्ध झाली होती. यावेळी शेखर घोष, रॉय, रतन कुयटे ही मंडळीही उपस्थित होती. प्रत्येक गोलंदाजाला साधारणपणे १० ते १२ चेंडू टाकण्याची संधी मिळत होती. केवळ नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे तर, पुणे, नगर येथीलही काही खेळाडू चाचणीसाठी उपस्थित होते. निफाड तालुक्यातील खेळाडूंची सर्वाधिक होती. या दप्प्यात निव्वळ गोलंदाजाचा वेग पाहण्यात आला. या टप्प्यातून निवड करण्यात येणाऱ्या खेळाडूंमधील तांत्रिक उणिवा दूर करण्याचे काम पुढील टप्प्यात करण्यात येणार आहे.
यावेळी साळगावकर यांनी या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली. हा केवळ एका वर्षांपुरता असलेला कार्यक्रम नाही. या उपक्रमाचे फळ साधारणपणे चार वर्षांनंतर मिळू शकेल. महाराष्ट्रातील इतर जिल्हा संघटनेच्या तुलनेत नाशिकची संघटना विविध उपक्रमांसाठी कायम पुढे राहात असल्याने जलदगती गोलंदाज शोध मोहिमेसाठीही प्रथम नाशिकचीच निवड करम्यात आली. वेगवान गोलंदाज होण्यासाठी कणखर मानसिकतेबरोबरच उन्हातान्हात घाम गाळण्याची तयारी असणे आवश्यक आहे. केवळ हौस म्हणून क्रिकेटच्या मैदानावर येणारे कधीच वेगवान गोलंदाज होऊ शकत नाहीत. अशा प्रकारच्या चाचण्यांमधून सध्या आम्ही केवळ खेळाडूंच्या गोलंदाजीतील वेग किती आहे. त्याचीच चाचपणी करत आहोत. त्यातही वीस वर्षांच्या आतील योग्य खेळाडू मिळाल्यास त्यांना पुढे भविष्य राहू शकेल. परंतु या चाचणीत ज्यांनी थोडीफार चमक दाखवली ते बहुतांशी खेळाडू बावीस वर्षांपुढील आहेत. हे असे अनेक प्रकारचे अडथळे आमच्यापुढे आहेत. चांगला प्रशिक्षक नेमहीच आश्रित असतो. पोट भरलेला माणूस कधीच प्रशिक्षक होऊ शकत नाही, असे साळगावकर यांनी नमूद केले.
या चाचणीतून निवडण्यात येणाऱ्या खेळाडूंना जिल्हा संघटनेतर्फे प्रशिक्षण देण्याची योजना आहे. अशा प्रकारच्या योजनेतूनच भविष्यात महाराष्ट्राला उत्तम वेगवान गोलंदाज मिळू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.