मराठवाडय़ातील दुष्काळाची स्थिती अतिशय गंभीर असून दुष्काळाने सर्वाच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेकांनी हात समोर केले आहेत. अभिनेता सलमान खान याने काही दिवसांपूर्वी दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. वचनपूर्ती करण्यासाठी त्याने अडीच हजार पाण्याच्या टाकींची ऑर्डर नागपुरातील एका कंपनीला दिली होती. या टाकींपैकी मराठवाडय़ातील पाच जिल्ह्य़ांसाठी पहिली खेप रवाना झाली आहे.   
मराठवाडा दुष्काळाच्या झळा सहन करत असून पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावात चाराटंचाईने जनावरांचे हाल बघवत नसून अनेक ठिकाणी चारा छावण्या तयार केल्या आहेत. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संघटनांनी मदतीसाठी हात समोर केले आहेत. अभिनेता सलमान खान यानेही मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्तांचे हाल बघून शक्य तेवढी मदत करण्याचे त्याने बोलून दाखविले होती. पाण्याची साठवणूक करता यावी आणि सर्वाना पाणी मिळावे म्हणून त्याने पाण्याच्या टाक्या पुरविण्याचे ठरविले.
नागपूर जवळील बुटीबोरी येथील बीईंग ह्य़ूमन द सलमान खान फाऊंडेशनमार्फत त्याने एका कंपनीला २५०० पाण्याच्या टाकींची ऑर्डर दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाण्याच्या टाक्या मराठवाडय़ासाठी रवाना करण्यात आल्या. प्रत्येक टाकीची किंमत १२ हजार रुपयांच्या जवळपास आहे.
बुटीबोरीतील एमआयडीसीतील कंपनीला १ मे ला २ ५००टाक्यांची ऑर्डर सलमान खानने दिली होती. प्रत्येकी दोन हजार लिटरची ही टाकी आहे. बीड, उस्मानाबाद, जालना, नांदेड आणि औरंगाबाद  याठिकाणी टाक्या पाठवणार असून पहिल्या टप्प्यात काही माल पाठविला आहे, असे कंपनी व्यवस्थापक गौरव घई यांनी सांगितले.