मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडतर्फे १० ते ११ नोव्हेंबर या कालावधीत सहाव्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे येथे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन कोल्हापूर संस्थानचे युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून त्या विषयांवर संघटना पुढील वर्षभर काम करणार आहे.
या अधिवेशनाची रूपरेषा व पूर्वतयारीची माहिती ब्रिगेडचे प्रदेश महासचिव मनोज आखरे व जिल्हाध्यक्ष गणेश कदम यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ‘व्यवस्था परिवर्तन’ हे अंतिम उद्दीष्ट ठेवून युवकांना प्रेरणा देण्याचे काम या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या महाअधिवेशन स्थळास ‘समाजभूषण इंजि. एम. पी. देवरे नगरी’ असे नांव देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी नऊ वाजता भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता महाअधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून बडोदा संस्थानचे महाराजा समरजित गायकवाड, ग्वाल्हेर संस्थानचे ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय गृहराज्यमंत्री प्रतीक पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पहिल्या सत्रात ‘जागतिकीकरण, खासगीकरण, उद्योगीकरण, युवकांपुढील आव्हाने व आजची शिक्षणपद्धती’, दुसऱ्या सत्रात ‘माजी प्रदेशाध्यक्षांचे अनुभव आणि अपेक्षा’, ‘प्रसारमाध्यमांची सामाजिक जबाबदारी’ या विषयावर चर्चासत्र होईल. रात्री नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात ‘द शिवाजी अंडरग्राउंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. राजकुमार तांगडे लिखीत हे नाटक असून त्याचे दिग्दर्शन नंदु माधव यांनी केले आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते दहा या कालावधीत शाहिरी कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळी दहा वाजता चौथे सत्र ‘मराठा आरक्षण – आजचे वास्तव व भूमिका’ या विषयावर होणार आहे. त्यात ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप कोंढरे, राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार सहभागी होणार आहेत. पाचव्या सत्रात दुपारी साडे बारा वाजता ‘धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक दहशतवाद’ या विषयावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती आखरे यांनी दिली.
समारोपाच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. इंजि. पुरूषोत्तम खेडेकर राहणार आहेत. याप्रसंगी छत्रपती संभाजी राजे गौरव पुरस्कार, मराठा समाज गौरव पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. पुरस्कार्थीची नांवे त्याच दिवशी जाहीर केली जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, महाअधिवेशनाच्या यशस्विततेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांची निवास व भोजनाची व्यवस्थाही केली जाणार असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे. महाअधिवेशनात पुस्तक विक्रीसाठी स्टॉलही उभारले जाणार आहेत.