सर्वाधिक शैक्षणिक पात्रतेचा जागतिक विक्रम नोंदविण्याची किमया नवी दिल्लीतील आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. पी. जे. सुधाकर यांनी करून दाखविली. डॉ. सुधाकर यांनी आतापर्यंत तब्बल १०२ पदव्या, तसेच १२ विषयांमध्ये पीएच. डी. केल्याची नोंद आहे.
भारतीय माहिती सेवेच्या १९८७ च्या तुकडीतील अधिकारी असलेले डॉ. सुधाकर यांचा जन्म आंध्रातील विशाखापट्टणम जिल्ह्य़ात गरीब कुटुंबात झाला. बालकामगार, हॉटेल कामगार, गुराखी, शेतमजूर व बांधकाम मजूर अशी पूर्वपीठिका, पुढे टंकलेखक म्हणून शासकीय सेवेत रुजू झालेले सुधाकर यांनी भारतीय नागरी सेवेची परीक्षा देऊन १९८७ मध्ये भारतीय माहिती सेवेत रुजू झाले. मात्र, हा प्रवास येथेच थांबला नाही. प्रारंभापासूनच ज्ञानाची ओढ असणाऱ्या डॉ. सुधाकर यांनी आतापर्यंत जवळपास सर्व शास्त्रशाखांमध्ये पदव्या प्राप्त केल्या आहेत. कला, वाणिज्य व विज्ञान शाखांबरोबरच संस्कृत, तेलगू, इंग्रजी, हिंदी भाषांच्या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. वैद्यकीय, कायदा, प्रशासकीय तसेच आंतरराष्ट्रीय कायदा, बँकिंग, माहिती-तंत्रज्ञान, मानसशास्त्र, पर्यावरण, पर्यटन, पत्रकारिता, जाहिरात, धर्म-तत्त्वज्ञान आदी क्षेत्रांतील पदव्यांचे ते धनी ठरले आहेत. वैद्यकीय, सामान्य कायदा व धर्म-तत्त्वज्ञान शास्त्रात दोन वेळा डॉक्टरेट मिळविण्याचा विक्रमही त्यांच्या खात्यावर जमा आहे.
डॉ. सुधाकर यांनी आतापर्यंत स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, हुंडा प्रतिबंध, बहुपत्नीत्व, बालकामगार, वेठबिगार, दारुबंदी, अस्पृश्यता, जातिप्रथा, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भेदभाव आदी समाजविघातक…..अनिष्टतांच्या…… विरोधात लढा दिला आहे. व्याख्याते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय मानसिक आरोग्य चळवळीचे डॉ. सुधाकर हे संस्थापक अध्यक्ष आहेत. १०० मानसोपचार तज्ज्ञामार्फत एड्सच्या रुग्णांचे समुपदेशन करण्याचे कार्य या संस्थेमार्फत केले जाते. डॉ. सुधाकर यांना महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. के. आर. नारायणन, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सौहार्द, संत रविदास, मदत तेरेसा, स्वर्णभारती या पुरस्कारांसह युनोचा आंतरराष्ट्रीय शांतिदूत आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. डॉ. सुधाकर यांनी आतापर्यंत विविध विषयांवर २२ हून अधिक ग्रंथ लिहिले आहेत, तसेच १०० हून अधिक संशोधनपर लेखही प्रकाशित झाले आहेत.
या जगावेगळ्या अजोड कामगिरीमुळे चर्चेत आलेले डॉ. सुधाकर हे गुरुवारी (दि. १७) औरंगाबाद शहरात येत आहेत. शुक्रवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागात ‘माध्यम व समाज’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.