समतावादी सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र शाखा, कोल्हापूर व युनिव्हर्सिटी स्टुडंट्स् असोसिएशन (यूएसए) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय समतावादी विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवाजी विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. उत्तम सकट यांची निवड करण्यात आली आहे.
समतावादी सांस्कृतिक चळवळीतर्फे खास विद्यार्थी व तरुणांसाठी पहिले राज्यस्तरीय समतावादी विद्यार्थी साहित्य संमेलन गुरुवार  ६ डिसेंबर २०१२ रोजी सकाळी ११ वाजता मुस्लिम बोर्डिंग हॉल, दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. समतावादी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यूएसएच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
डॉ. उत्तम सकट हे विद्यार्थीदशेपासूनच विविध सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. ते एम.एस.डब्ल्यू.सेट असून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ातील, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या परिणामांचा अभ्यास या विषयावर पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केले आहे.
वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग असतो. कोल्हापूर येथे पहिल्या समतावादी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा पुढाकार होता. त्यांनी विविध राष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग घेतला असून शोधनिबंधाचे वाचनही केले आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनात उद्घाटन समारंभ, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप समारंभ असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थी व तरुणांनी मोठय़ा संख्येने संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन साहित्या संमेलनाच्या आयोजकांच्यावतीने  करण्यात आले.
बैठकीस यूएसएचे राज्याध्यक्ष प्रकाश नाईक, अमोल महापुरे, लालासाहेब नाईक, प्रा.धनंजय साठे, प्रवीण लोंढे, विजय पवार, विश्वनाथ तराळ आदी उपस्थित होते.