27 February 2021

News Flash

दोन कोटी रुपयांचे रेती उत्खनन साहित्य जप्त

पनवेल तालुक्यामधील विविध दगडखाणी (क्रशरस्टोन) आणि खाडीलगत अवैध रेती उत्खननावर जिल्हाधिकारी शीतल उगले-तेली यांनी पनवेलच्या महसूल विभागाला अंधारात ठेवून कारवाई केल्याने पनवेलच्या महसूल विभागाची झोप

| August 14, 2015 03:35 am

पनवेल तालुक्यामधील विविध दगडखाणी (क्रशरस्टोन) आणि खाडीलगत अवैध रेती उत्खननावर जिल्हाधिकारी शीतल उगले-तेली यांनी पनवेलच्या महसूल विभागाला अंधारात ठेवून कारवाई केल्याने पनवेलच्या महसूल विभागाची झोप उडाली. तब्बल सत्तर अधिकाऱ्यांची सहा पथके स्थापन करून ही कारवाई करण्यात आली आहे.तालुक्यामध्ये ६६ दगडखाणी आहेत. त्यांची कागदपत्रे तपासण्यात आली. प्रत्येक दगडखाणीतून निघणाऱ्या उत्पन्नाचा तपशील या वेळी घेण्यात आला. काही ठिकाणी दगडखाणी विनापरवाना चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. गणेशपुरी येथील सहा अवैध दगडखाणी सीलबंद करण्यात आल्या. दगडखाणींसह महसूल विभागाच्या पथकाने पनवेलच्या खाडी किनारपट्टीवर सुरू असलेल्या रेती उत्खननावर थेट धाड टाकली. मंगळवारी दुपारी सुरू केलेली कारवाई बुधवार पहाटेपर्यंत सुरू होती. या कारवाईदरम्यान काही रेतीची वाहतूक करणारे डम्पर पकडण्यात आले. या डम्परचालकाच्या चौकशीनंतर या अवैध रेतीचा साठा करणारा पनवेलचा राजकीय वर्तुळातील बडा नेता तसेच नामांकित उद्योगपतीच्या नावाने रेतीचे ढिगारे लावल्याचे जिल्हाधिकारी उगले-तेली यांच्या चौकशीत उघड झाले. महसूल विभागाच्या पथकाने कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला.
बुधवार पहाटेपर्यंत ३ डम्पर, १ टँकर, २ जेसीबी मशीन, एक पोकलन, एक हजार ब्रास रेती, ग्रीट पावडरने भरलेले सहा डम्पर अशी मालमत्ता जप्त केली. रेती आणि दगडखाणींवरील या धाडसत्रामध्ये तब्बल दोन कोटी रुपयांचे साहित्य जिल्हाधिकारी उगले-तेली यांच्या पथकाने जप्त केले. मंगळवारी व बुधवारी टाकलेल्या धाडसत्रामध्ये गणेशपुरी उलवा येथे अवैध रेती उत्खनन होताना धाड टाकल्याचे जिल्हा महसूल विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. विशेष म्हणजे याच खाडीकिनारपट्टीवर पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनीही पदभार स्वीकारल्यावर ३ व ८ जुलै रोजी तहसीलदार व नायब तहसीलदारांनी धाडी टाकल्या होत्या. त्या वेळीही किरकोळ रेती जप्त केल्याचे दाखविण्यात आले होते. तहसीलदार आकडे यांच्या कारवाईनंतरही त्याच ठिकाणी अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी उगले-तेली यांच्या धाडीमुळे उघड झाले. त्यामुळे स्थानिक महसूल विभाग आणि तालुक्यातील रेती व्यवासायिकांचे हितसंबंध जिल्हाधिकारी उगले-तेली यांच्या कारवाईने उघड केल्याची चर्चा महसूल विभागात आहे.

किनारपट्टीवर महसूल विभागाच्या हद्दीचा वाद
बेलापूर व खारघर खाडी किनारपट्टीवर काही बोटी उभ्या आहेत. ही हद्द नेमकी कोणाची आहे. यावरून महसूल विभागातील ठाणे व रायगड जिल्हा प्रशासनामध्ये वाद सुरू आहेत. या वादाचा फायदा घेऊन या किनारपट्टीचा उपयोग मोठय़ा प्रमाणात रेती उत्खनन करणारे करतात. येथे मोठय़ा बोटी उभ्या आहेत. यामागे राजकीय आशीर्वाद असल्याचे या परिसरात बोलले जाते. पनवेलच्या स्थानिक महसूल विभागाने जिल्हाधिकारी उगले-तेली यांना ही वादाची किनारपट्टी दिसू नये याची संपूर्ण दक्षता घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 3:35 am

Web Title: sand excavation materials seized two core
Next Stories
1 बोटींचे मालक व मजुरांमधील मतभेदाच्या जाळ्यात मासेमारीची तडफड
2 उरण, जेएनपीटी परिसरात तेलमाफियांची लुटमार
3 खादी कपडय़ांची मागणी वाढली स्वातंत्र्य दिनाच्या तयारीची लगबग
Just Now!
X