बेकायदा वाळू वाहतूक करणा-या वाहनांना पकडणा-या पोलीस पथकाला वाळूतस्करांनी एअर पिस्तूल रोखून रस्ता अडविण्याचा प्रकार शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास पळसपूर व कर्जुले हर्या परिसरात घडला. या प्रकरणी मालमोटारचालक व वाळूतस्कर अशा आठ जणांना पोलिसांनी अटक केली.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाळूचा लिलाव झाला नसतानाही मांडओहोळ नदीपात्रातून मोठय़ा प्रमाणात बेकायदा वाळूउपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुक्यातील शिंदेवाडी फाटा, पळसपूर शिवार, मांडओहोळ फाटा, कर्जुले हर्या शिवारात पोलीस पथकाने बेकायदा वाळू वाहतूक करणारी मालमोटार (एमएच ११ आयजी ६४६०), टेम्पो (एमएच १७ एजी ४०६४, एमएच १६ क्यू ५५३५ व एमएच १७ एज़्‍ाी ५७०३) ही वाहने ताब्यात घेतली.
पथकाने वाळू वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतल्याचे समजताच सचिन किसन आहेर (रा. अणे, ता. जुन्नर) हा कारमधून (एमएच ४६ एच १७९०) आला व त्याने पोलिसांवर एअर पिस्तूल रोखले. तुम्ही गाडय़ा कशा नेता, बाजूला सरका, अशी अरेरावीची भाषा वापरत, आम्ही पत्रकार आहोत असा दमही भरला. आहेर याच्यासमवेत विठ्ठल बबन झावरे (वासुंदे), गणेश सूर्यकांत मोरे (अणे), अजय मारुती बेलकर (काळेवाडी) हे वाळूतस्कर होते.
पोलिसांनी सुमारे ४० हजार रुपयांची, दहा ब्रास वाळू जप्त केली. तसेच रस्ता अडविणे, हत्यार वापरणे, गौण खनिजाची चोरी करणे व सरकारी कामात अडथळा आणणे या कायद्यानुसार ४ वाळूतस्करांसह सर्जेराव सुखदेव पवार (देसवडे), बाळू पोपट पारधी, राजांबूत, सुरेश कोंडिभाऊ काशिद (वारणवाडी), संजय खेमा भुतांबरे (नांदूर खंदरमाळ) या वाहनचालकांवर गुन्हा दाखल करून अटक केली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले, सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, पोलीस कर्मचारी विलास जगताप, नितीन शिंदे, रवींद्र टकले, महेश भवर यांचा पोलीस पथकात समावेश होता.