निलंगा तालुक्यात नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणारे ५ ट्रॅक्टर तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्या पथकाने पकडून सुमारे एक लाखाचा दंड वसूल केला, तसेच लिलाव न झालेल्या वाळू घाटावरील वाळू सुरक्षित राहावी, या साठी जेसीबीच्या साह्य़ाने चर खोदून रस्ता अडवला. महसूल विभागाच्या या धाडसी कारवाईने वाळू मफियांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील ११ पैकी सावरी, सोनखेड, गिरकचाळ, गौर, मसलगा या पाच वाळूघाटांचे लिलाव अजून झाले नाहीत. वाळूचोरी थांबविण्यासाठी तहसील विभागाने यापूर्वीच मंडळ अधिकारी, तलाठी यांची पथके तैनात केली आहेत. या पथकांमुळे मेटाकुटीस आलेल्या वाळूमाफियांनी पथकांच्या डोळ्यात धूळफेक करीत रात्रीच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक सुरू केली होती. महसूल प्रशासनाने या बाबत आलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केली.
जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा व निलंग्याचे उपविभागीय अधिकारी ए. बी. मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नामदेव टिळेकर व नायब तहसीलदार उत्तमराव सबनीस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी पहाटे चारपासून नदीकाठावर जाऊन वाळू चोरांवर पाळत ठेवली. त्या वेळी वाळू भरून ट्रॅक्टर नदीपात्रातून बाहेर पडत असल्याने पथकाला आढळले. पथकाने पाचही ट्रॅक्टर पकडले. या वेळी काही ट्रॅक्टरचालक व मालकांनी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास भीक न घालता पथकाने घटनेचा पंचनामा करून प्रत्येकी १८ हजार ५०० रुपयांप्रमाणे १ लाखाचा दंड आकारून ट्रॅक्टर औराद पोलीस ठाण्यात जमा केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या फिरत्या पथकाने तालुक्यातील जामगा शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून १० हजारांचा दंड वसूल केला. लिलाव न झालेल्या सावरी, शेळगी, औराद सीमेवरील तेरणा नदीपात्रातील वाळू सुरक्षित राहावी, या साठी महसूल प्रशासनाने ५ तास जेसीबीच्या साह्य़ाने नदीपात्रात येणारे दहा रस्ते सात-आठ फूट खड्डे करून वाळूचोरी थांबविण्याचा प्रयत्न केला. निलंगा महसूल प्रशासनाने आतार्पयंत रॉयल्टी न भरता वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या १८२ प्रकरणांत ८ लाख ७६ हजार रुपये दंड वसूल केला. पथकात तहसीलदार नामदेव टिळेकर, नायब तहसीलदार उत्तमराव सबनीस, मंडळ अधिकारी एस. बी. दिवाण, एस. बी. डोंगरे, तलाठी डी. के. पिनाटे, आर. व्ही. कांबळे, शेख, सोळुंके, खंदारे, बिराजदार, जाधव यांचा समावेश होता.