‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या काव्यपंक्तींद्वारे जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे कवी व शिक्षक साने गुरुजी यांच्या येथील कर्मभूमीत असलेल्या वास्तूंना झळाळी प्राप्त करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. साहेबराव पाटील यांनी दिली. गुरुजींची २४ डिसेंबर रोजी जयंती असून, त्याआधी हे काम मार्गी लावण्याचा मानस आ. पाटील यांचा आहे.
गुरुजींनी वास्तव्य केलेली खोली, प्रताप विद्यालयाच्या प्रांगणातल्या ज्या ओटय़ावरून गुरुजींनी शिकविले तो ओटा, शहरातील पुतळा या वास्तूंची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ग्रेनाइट बसविणे, खोलीचे छत व मोडकळीस आलेले द्वार, खिडक्यांचे नूतनीकरण करून रंगकाम करणे, तारेचे कुंपण अशी कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच करण्यात येणार असल्याचे उपअभियंता एस. एस. वारुळे यांनी नमूद केले आहे.
तब्बल सहा दशकांनंतर गुरुजींनी वास्तव्य केलेल्या वास्तूंना झळाळी येणार असली तरी गुरुजींच्या या कर्मभूमीत त्यांचे स्मारक व्हावे ही अमळनेरकरांची मागणी पुन्हा एकदा यानिमित्ताने ऐरणीवर आली आहे. स्मारकासाठी समिती गठित होऊन कित्येक वर्षे उलटली, पण अद्यापही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. अमळनेरमध्ये गुरुजींनी सात वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. १९३१ मध्ये नोकरी सोडून कायदेभंग चळवळीत भाग घेतला. पूर्वीच्या पूर्व खान्देशातील (आताचा धुळे-जळगाव जिल्हा) अनेकांना स्वातंत्र्य लढय़ात भाग घेण्यासाठी त्यामुळे प्रेरणा मिळाली. येथूनच त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. १९३१ मध्ये तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. १९३६ मध्ये फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य केले. याच अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून मैला वाहणे व ग्रामस्वच्छतेची इतर कामे केली. राष्ट्रसेवादलाची स्थापना केली. ज्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीस खान्देशात धार दिली. त्याच काँग्रेसची राज्यात अनेक वर्षांपासून सत्ता असूनही गुरुजींचे स्मारक अद्यापही होत नसल्याबद्दल अमळनेरमध्ये नाराजी आहे.
गुरुजींच्या स्मरणार्थ अमळनेरमध्ये होणारे स्मारक रायगड जिल्ह्य़ातील वडघर येथे असलेल्या भव्य स्मारकासारखे असावे, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.