27 February 2021

News Flash

संगमनेरकरांना चिंता ‘रित्या’ भंडारदऱ्याची!

ऐन उन्हाळ्यात प्रवरा दुथडी भरुन वाहिली. नळालाही मुबलक पाणी येतय.. प्रवरामाईच्या पाण्याचा गोडवाही काही औरच. मात्र जसजसे भंडारदरा धरण ‘रिते’ होत गेले, तसतसे हेच प्रवरेचे

| May 10, 2013 01:40 am

ऐन उन्हाळ्यात प्रवरा दुथडी भरुन वाहिली. नळालाही मुबलक पाणी येतय.. प्रवरामाईच्या पाण्याचा गोडवाही काही औरच. मात्र जसजसे भंडारदरा धरण ‘रिते’ होत गेले, तसतसे हेच प्रवरेचे पाणी आता संगमनेरकरांना ‘गोड’ लागेनासे झाले आहे!
वर्षांनुवर्षे प्रवरामाई नदीकाठच्या जीवसृष्टीची तहान भागवत आहे. नदी वाहती असली की काठावर एक वेगळेच चैतन्य संचारते. भंडारदरा झाल्यानंतर प्रवरेला नियमितपणे आवर्तने सुटू लागली. त्यामुळे अपवादात्मक टंचाई वगळता नदीकाठची तहान कायमच भागवली गेली. कधीकाळी आवर्तन लांबले तरी भंडारदरा धरणामध्ये मुबलक पाणीसाठा आहे, या एकाच जाणिवेने सर्वकाही आलबेल असल्यासारखे वाटायचे. मात्र यावर्षी धरणाने तळ गाठला, आता पुढे महिना दीड महिना पाऊस आलाच नाही तर प्यायच्या पाण्याचे करायचे काय हा यक्षप्रश्न नागरिकांपुढे आहे.    
संगमनेर शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा हा भंडारदऱ्याच्या पाणीसाठय़ावर अवलंबून आहे. त्यामुळे दरवर्षी तालुक्यात पाऊस किती झाला, यापेक्षा भंडारदरा धरण किती भरले याकडे शहरवासीयांच्या नजरा असतात. एकदा का धरणाने गुळणी फेकली की संगमनेरकर जल्लोष करतात. कारण आगामी वर्षभराचा शहराचा पाण्याचा प्रश्न सुटलेला असतो. यावर्षी सर्वत्र दुष्काळ पडला तरी भंडारदऱ्यासह निळवंडे धरण भरल्याने संगमनेरकर निश्चिंत होते. फेब्रुवारीच्या आरंभापर्यत सर्व काही सुरळीत चालू होते. मात्र अचानक जायकवाडीचा प्रश्न पुढे आला आणि लगोलग जायकवाडीसाठी पाणीही सोडले गेले. टंचाईच्या काळात सर्वाचे थोडेथोडे भागले पाहिजे, या मानवतेच्या दृष्टिकोनातून या आवर्तनाला फारसा विरोध झाला नाही.
मात्र जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या दुसऱ्या आवर्तनाने सर्वाची झोप उडवली.
दिवसागणिक धरण रिते होत गेले, आता आपल्याला पाणी कोठून मिळणार ही चिंता सर्वाना सतावते आहे. न्यायालयाच्या आदेशापुढे कोणाचे काही चालत नाही म्हणून पाणी सोडले असे म्हणत सर्वच आपापले तोकडे समाधान करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र न्यायालयात सरकारच्या वतीने योग्य बाजू मांडली गेली असती तर न्यायालयाने अशा पद्धतीचा निर्णय दिला नसता, असाही विचारप्रवाह मूळ धरु लागला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही एका सभेदरम्यान हेच अधोरेखित केले. त्याच सभेत एका कार्यकर्त्यांने न्यायालयाचा आदेश झुगारुन देत चाक बंद करायला चला अशी हाक दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाने तालुकावासियांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र आगामी काळात या निर्णयाचे दुष्परिणाम भोगायची वेळ आली तर हा असंतोष एकवटायलाही वेळ लागणार नाही.
या पाश्र्वभूमीवर सगळ्यांच्या नजरा वळवाच्या पावसाकडे लागल्या आहेत. एक दोन वळवाचे पाऊस झाले आणि धरणाचा पाणीसाठा वाढला, की या संकटातून सर्वाची नैसगिक मुक्तता होईल. या सर्व अनागोंदीला जबाबदार असणाऱ्यांना देखील अवकाळी पाऊसच वाचवू शकतो. एकूणच सध्यातरी संगमनेर शहरासह संपूर्ण प्रवराकाठ भविष्यात वाढवून ठेवलेल्या पाणीटंचाईने चिंतित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 1:40 am

Web Title: sangamner citizen worried about low water level of bhandardara
Next Stories
1 सोलापुरात उद्यापासून तीन दिवस शिवालय व्याख्यानमालेचे आयोजन
2 पेटवून घेतलेल्या आईसह मुलाचाही भाजून मृत्यू
3 सोलापूरचे तापमान ४४ अंशांच्या दिशेने
Just Now!
X