सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे कत्रे-करविते ठरविण्यासाठी ७ जुल रोजी मतदान होत आहे. महापालिका स्थापनेनंतर होणारी ही चौथी पंचवार्षकि निवडणूक असून ३८ प्रभागांमधून ७८ सदस्य महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी निवडले जाणार आहेत. ३ लाख ८९ हजार ३१४ मतदार या सदस्यांची निवड करणार असून ५० टक्के आरक्षणामुळे नव्या महापालिकेत महिला सदस्य संख्या ३९ राहिल.
महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय देगावकर यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमाची मंगळवारी सायंकाळी घोषणा केली. सांगली,मिरज आणि कुपवाड शहर अशा तीन शहरांची मिळून असणारी संयुक्त महापालिका चौथ्यांदा सार्वत्रिक निवडणुकीस सामोरी जात आहे.  
तीनही शहरात मिळून ३८ प्रभाग असून ७८ सदस्य निवडून द्यायचे आहेत. काही प्रभाग द्विसदस्यीय तर काही त्रिसदस्यीय आहेत. खुल्या गटासाठी ४६ जागा असून त्यापकी २२ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. इतर मागास प्रवर्गासाठी २१ जागा आरक्षित असून त्यामधील ११ जागा महिलांच्या आहेत. तर अनुसूचित जाती-जमातीसाठी ११ जागा निश्चित करण्यात आल्या असून त्यापकी ६ जागा महिलांसाठी आहेत.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारी अर्ज मिळण्यासाठीची मुदत ११ जून ते १८ जून दुपारी २ वाजेपर्यंत ही आहे. तर उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत ११ जून ते १८ जून दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. अर्ज स्वीकारणे अथवा देणे यासाठी रविवार दि. १६ जून रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारचा दिवस रिक्त ठेवला आहे.
उमेदवारी अर्जाची छाननी दि. १९ जूनला होणार असून वैध अर्जाची घोषणा त्याच दिवशी केली जाईल. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत दि. २१ जून दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप २२ जून रोजी होणार असून त्याच दिवशी सायंकाळी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.  अंतिम उमेदवार यादी निश्चितीनंतर रविवार दि. ७ जुल रोजी मतदान घेतले जाणार आहे. सकाळी ७.३० पासून सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान घेतले जाणार आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ जुल रोजी मतमोजणी प्रक्रिया होत आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यामुळे तीनही शहरात आज रात्री १२ वाजल्यापासून निवडणूक आचारसंहिता लागू होत आहे. निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत मतदारांना वश करण्यासाठी कोणतीही विकासात्मक कामे सुरु करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
महापालिकेचे ७८ सदस्य निवडण्यासाठी ३ लाख ८९ हजार ३१४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या १ लाख ९१ हजार ५२३ आहे. गतवेळेपेक्षा मतदार संख्या ९७ हजारांनी वाढली आहे. चार प्रभागात पुरुषांच्यापेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. यामध्ये सांगलीतील उत्तर शिवाजीनगर पुरुष ३९९५, महिला ४३८८, गावभाग पुरुष ५३११ महिला ५३८७ आणि मिरजेतील इस्त्राईलनगर पुरुष ४४४२ महिला ४५९७ आणि उत्तमनगर पुरुष ४३९४ महिला ४४४१ अशी आहे.