मुजोर अधिका-यांना वठणीवर आणण्याचा इशारा देताच महापालिकेच्या अधिका-यांनी गुरुवारी काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या घरी जाऊन संघर्ष मिटवण्याचे साकडे घातले. मात्र मदन पाटील यांनी गेल्या पाच महिन्यांत प्रशासनाने कोणती विकासकामे केली याचा जाब विचारत अधिका-यांना खडसावले.
विकासकामांची यादी मागितल्यावरून उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर आणि प्रभारी शहर अभियंता चंद्रकांत सोनवणे यांच्यात झालेल्या संघर्षांचे पडसाद तीव्रपणे उमटले आहेत.  दोघांनीही परस्परविरोधी तक्रारी सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.  पदाधिका-यांच्या अरेरावीच्या विरोधात प्रशासनाने संघर्षांची भूमिका घेत नियमानुसार काम सुरू केले असून, महापालिकेच्या मोटारी आणि मोबाइल जमा करण्याचा निर्णय काल जाहीर केला होता.  मात्र महापालिकेच्या स्टोअर विभागाकडे आज कोणतीही वाहने अथवा मोबाइल जमा झाले नसल्याचे उपमहापौर  पाटील यांनी सांगितले.
गुरुवारी दुपारी महापालिकेतील सर्व अधिकारी या वादावर तोडगा काढण्यासाठी मदन पाटील यांना भेटण्यास निवासस्थानी गेले होते. अधिका-यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पाटील यांनी प्रशासन अडवणुकीचे धोरण स्वीकारत आहे. त्यामुळे सर्वसामान्याची कामे रखडली आहेत. गेल्या पाच महिन्यांत कोणतेही भरीव काम दिसत नाही. मग प्रशासनाच्या पाठीशी का राहावे? असा सवाल करून या वादासंदर्भात जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनाच भेटा असा सल्ला दिला.
अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी तहकूब झालेली स्थायी समितीची सभा शुक्रवारी होत आहे. त्या वेळी या संघर्षांतील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हाधिका-यांनीही अधिका-याचा स्थायी समितीवरील बहिष्कार असल्याचे स्पष्ट केले आहे.