महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळख असलेल्या बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर येथील दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
शिवकालीन इतिहासातील एक महत्वपूर्ण किल्ला म्हणून साल्हेरचा उल्लेख आहे. १६७१ मध्ये हा किल्ला महाराजांनी जिंकला होता. ५१५० फूट उंचीवरील हा किल्ला भगवान परशुरामाची तपोभूमीही आहे. नाशिकपासून १५० किलोमीटरवर हा किल्ला आहे. सह्य़ाद्रीतील सेलबारी डोंगर रांगेत हा किल्ला अग्रणी आहे. पूर्वेकडून वाघांबे गावातून तर पश्चिमेकडून साल्हेर गावातून चढाईला सुरूवात करावी लागते. या मार्गावर सात प्रशस्त प्रवेशव्दार बघावयास मिळतात. कातळात खोदलेल्या १२५ पायऱ्या, पाण्याचे टाके, गुहा, बुरूज येथे आहेत. किल्ला तीन टप्प्यात असून पायथ्याशी साल्हेर वाडी, मधला टप्पा म्हणजे गाव कचेरी आणि अंतीम टप्पा म्हणजे परशुराम मंदीर.
किल्ल्यावर अनेक प्रकारची वनराजी असून औषधी वनस्पतीदेखील आहेत. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे किल्ल्यावर मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत असून मद्यपींचे प्रमाणदेखील वाढले आहे. साल्हेर किल्ला व परिसराची माहिती पर्यटकांना होण्यासाठी वन विभागाने किल्ल्याच्या पायथ्याशी निसर्ग परिचय केंद्र उभारले आहे.
दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानतर्फे किल्ल्यावरील गुहा व तळी स्वच्छ करण्यात आली. गडाखालील आश्रमशाळेत मुलांना गड किल्ले आणि निसर्ग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच किल्ल्याचा इतिहास समजावून देण्यात आला. या मोहिमेत प्रा. आनंद बोरा, विजय कुमारघोटे, पप्पू जगताप, राकेश माळी, सागर घोलप आदी सहभागी झाले होते.