News Flash

मौलवींच्या ‘तक्रीज’द्वारे मुस्लीमबहुल वस्त्या स्वच्छतेच्या दिशेने

अस्वच्छता, दरुगधीमुळे उकीरडा बनलेल्या झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा वसा मुंबईमधील तब्बल ३७ मौलवींनी घेतला असून दर शुक्रवारी नमाज पठणापूर्वी होणाऱ्या ‘तक्रीज’द्वारे (उपदेशपर भाषण)

| July 30, 2015 12:35 pm

मुंबई महापालिका मुख्यालय.

अस्वच्छता, दरुगधीमुळे उकीरडा बनलेल्या झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा वसा मुंबईमधील तब्बल ३७ मौलवींनी घेतला असून दर शुक्रवारी नमाज पठणापूर्वी होणाऱ्या ‘तक्रीज’द्वारे (उपदेशपर भाषण) झोपडपट्टीवासीयांना स्वच्छतेचे धडे दिले जात आहेत. मौलवींकडून केल्या जाणाऱ्या या उपदेशांमुळे झोपडपट्टय़ा हळूहळू स्वच्छ होऊ लागल्या आहेत. परिणामी आरोग्याचे प्रश्नही आपसूकच सुटू लागले आहेत.
पालिकेच्या एम-पूर्व विभाग कार्यालयाच्या हद्दीमधील गोवंडी, मानखुर्द, देवनार, ट्रॉम्बे, चेंबूर (पू.) या भागात अनेक झोपडपट्टय़ा असून मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने या झोपडपट्टय़ांमध्ये वास्तव्यास आहेत. दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपडपट्टय़ांमधील उघडी गटारे, झोपडीलगत, तसेच जवळच्या नाल्यात टाकला जाणारा कचरा आदी कारणांमुळे हा परिसर बकाल बनला आहे. दरुगधी तर या वस्त्यांच्या वाचवीला पूजली आहे. झोपडपट्टय़ांमध्ये स्वच्छता केल्यानंतर एक-दोन दिवसातच पुन्हा त्यांना बकाल स्वरुप येत होते. त्याबरोबर साथीच्या आजारांचा प्रादुर्भावही होत होता. त्यातच पावसाळा सुरू झाल्यानंतर डेंग्यु, लेप्टोस्पायरोसिक, स्वाईन फ्लू, हिवतापाच्या साथींचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेने पालिका अधिकारी चिंतीत झाले होते. स्वच्छतेसाठी अधिक कर्मचारी तैनात करूनही परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती. कारण घराघरातील झोपडपट्टय़ांमधील छोटय़ा गल्ल्या, मोकळ्या जागा, नाल्यात कचरा भिरकावण्यात येत होता. त्यामुळे आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत होते. गोवंडी, मानखुर्द, देवनार, ट्रॉम्बे, चेंबूर (पू.) परिसरातील मुस्लीम बहुल परिसरात तब्बल ४२ मशिदी आहेत. त्यामुळे झोपडपट्टय़ांमधील स्वच्छतेसाठी मशिदींतील मौलवींची मदत घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मौलवी आणि मशिदींच्या विश्वस्तांसाठी एक बैठक आयोजित करण्यात आली. झोपडपट्टीवासियांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी मौलवींवर सोपविण्याची विनंती मशिदींच्या विश्वस्तांना करण्यात आली. विश्वस्तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तब्बल ३७ मौलवी पुढे आले. पालिका अधिकाऱ्यांनी या मोलवींना स्वच्छतेबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. दर शुक्रवारी मशिदींमध्ये मनाज पठणापूर्वी मौलवींमार्फत ‘तक्रीज’ म्हणजे उपदेश देण्याची प्रथा आहे. मौलवींनी आपल्या उपदेशांमध्ये स्वच्छतेचे धडे देण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्या परिसरातील रहिवाशांवर त्याचा परिणाम होऊ लागला. झोपडपट्टय़ांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी होत असल्याचे आढळून आले. तसेच नाला, गटार, तसेच झोपडीलगतच्या मोकळ्या जागात कचरा टाकण्याचे प्रमाणही कमी होऊ लागले. हळूहळू झोपडपट्टय़ा कात टाकू लागल्या आहेत.

 

मौलवींनी स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व पटवून दिल्यामुळे झोपडपट्टीवासियांमध्ये परिवर्तन होऊ लागले आहे. झोपडपट्टय़ांमधील स्वच्छतेच्या दृष्टीने पालिकेने मौलवींच्या मदतीने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता हळूहळू या वस्त्यांमधील कचरा आणि दरुगधीचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यामुळे आरोग्याचे प्रश्नही सुटू शकतील.
किरण दिघावकर,
सहाय्यक आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 12:35 pm

Web Title: sanitation survey of two urban slum muslim communities
Next Stories
1 मालक-भाडेकरूंमधील संघर्षांची किनार जीवघेणी!
2 मोहंमद रफी यांच्या गाण्यांचे स्मरणरंजन ‘फिर रफी’
3 आकाशवाणीत विविधरंगी ‘गोफ’ रंगला
Just Now!
X