गोदावरी, कपिला व नासर्डी या तीन नद्यांच्या स्वच्छतेला प्राधान्य देवून स्वच्छतेच्या कार्यात प्रशासनाला नाशिककरांनी हातभार लावण्याचे आवाहन करतानाच नद्यांमध्ये नाल्यांव्दारे जाणारे सांडपाणी बंद करण्याची सूचना आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी केली. महापालिकेच्या लोकनेते पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन रविशंकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महापौर अशोक मुर्तडक तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विद्यानंद सरस्वती, आ. छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याआदी गोदावरी प्रदुषणमुक्त करण्याची गरजही रविशंकर यांनी व्यक्त केली. केवळ उत्कृष्ठ इमारत बांधून उपयोग नाही तर, इमारतीत काम करणाऱ्यांची वागणूकही उत्तम असावी. या कार्यालयातून उल्लेखनीय असे काम होईल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महापौर अशोक मुर्तडक यांनी नदी स्वच्छतेबरोबर स्वच्छ व सुंदर नाशिकसाठी युद्ध पातळीवर काम करून शहराचा नावलौकीक वाढविण्याची ग्वाही दिली. आ. छगन भुजबळ यांनी नदीपात्रात जाणारे गटारीचे पाणी बंद करावे व गोदावरी शुद्धीकरणावर भर देण्याचे आवाहन केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भविष्यात नाशिक सुंदर दिसेल, असा आशावाद व्यक्त केला. शहरात सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेतून नवीन विकास घडेल, असेही ठाकरे यांनी नमूद केले. माजी आमदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांनी नाशिक हे दृतगतीने वाढणारे शहर असून महापालिकेला आव्हानात्मक काम करावे लागेल, असे सांगितले.
पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी इमारत हे केवळ विकास घडवून आणण्याचे एक साधन असल्याचे नमूद केले. खासगी क्षेत्राप्रमाणे महापालिकेतही वातावरण असेल तर कार्यक्षमताही वाढते. महापालिकेचे प्रत्येक कामकाज संगणकावर होण्याच्या दृष्टिने नियोजन केले जाईल, असा विश्वासही डॉ. गेडाम यांनी व्यक्त केला.
यावेळी उपमहापौर गुरमित बग्गा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रभागाच्या नगरसेविका विमल पाटील यांनी मनोगत व्यकत् केले. सूत्रसंचालन मयुरी कुलकर्णी यांनी केले. आभार मनसेचे गटनेते अशोक सातभाई यांनी मानले. लोकनेते कै. पंडितराव खैरे यांच्या कार्याचा मनपातर्फे मरणोत्तर गौरव नगरसेवक शाहू खैरे यांना मानपत्र देऊन करण्यात आला.