चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने पालकमंत्री संजय देवतळे यांना दिलेली उमेदवारी तातडीने बदलण्यात यावी, अशी मागणी महापौरांसह ३० नगरसेवकांनी काँंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना महापौरांनीच उमेदवार बदलण्याची मागणी केल्याने काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे.
मंगळवारी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी संजय देवतळे यांचे नाव जाहीर करण्यात आले. या नावाला माजी खासदार नरेश पुगलिया गटाने कडाडून विरोध दर्शविला आहे. या विरोधातूनच आज देवतळे यांची उमेदवारी तातडीने बदलण्यात यावी अशी मागणी महापौर संगीता अमृतकर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून देवतळे यांना उमेदवारी देणे पूर्णत: चुकीचा निर्णय आहे. देवतळे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या शिस्तीचे पालन कधीच केलेले नाही. त्यामुळेच या जिल्हय़ात काँॅग्रेसची पिछेहाट झालेली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत आपण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आल्या असता या प्रचारसभेला आमदार संजय देवतळे अनुपस्थित होते. तेव्हा देवतळे यांनी भाजप उमेदवाराचा खुलेआम प्रचार केला. त्याचाच परिणाम वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून पुगलिया यांना २२ हजार मते कमी मिळाली. देवतळे यांची पक्षविरोधी कृती बघता तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेश कॉग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. अशा पक्षविरोधी काम करणाऱ्यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याने निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दु:खावल्या गेल्या आहेत. देवतळे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षहिताला धरून नाही असेही या पत्रात म्हटले आहे. एवढेच नाही तर पक्ष विरोधी काम करणाऱ्या देवतळे यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात पर्यावरण व सांस्कृतिक मंत्री तसेच पालकमंत्री म्हणून स्थान देण्यात आले. परंतु देवतळे यांनी मंत्री म्हणून काहीच केलेले नाही. एक अपयशी मंत्री अशीच त्यांची ओळख आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना त्यांना नागरिकांचा रोष सहन करावा लागला होता.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी या शहराच्या पंचशताब्दी निमित्त २५० कोटींचा निधी दिला असताना देवतळे यांच्या आडकाठीमुळे १२५ कोटींचा निधी अजून मिळालेला नाही. त्यामुळे शहराचा विकास पूर्णत: खुंटलेला आहे. आदिवासींना वनजमिनीचे पट्टे, बल्लारपुरात झोपडपट्टीधारकांना पट्टे मिळवून देण्यााऐवजी त्यात आडकाठी निर्माण केली. त्यामुळे हजारो आदिवासी व गरीब वनजमिनीच्या पट्टय़ांपासून वंचित राहिले. भद्रावती नगर पालिकेत देवतळे यांना केवळ दोन नगरसेवक निवडून आणता आले. अशा निष्क्रीय पालकमंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी देणे योग्य नाही, असेही महापौर यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.
 या पत्रावर काँंग्रेसच्या २४ व अपक्ष सहा अशा एकूण ३० नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, महापौरांच्या या पत्राने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आल्याने पक्षात दुफळी माजली आहे.
३० नगरसेवकांचे महापौरांकडे राजीनामे
या लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री संजय देवतळे यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच महापौर संगीता अमृतकर यांच्या अध्यक्षतेखाली ३० नगरसेवकांची तातडीची बैठक झाली. या बैठकीला काँंग्रेसचे २४ व अपक्ष ६ नगरसेवक हजर होते. या सर्व ३० नगरसेवकांनी महापौर संगीता अमृतकर यांच्याकडे राजीनामे सादर केले आहेत. या राजीनाम्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.