संजय मंडलिक यांना महायुतीकडून उमेदवारी दिली तर शिवसैनिक ती स्वीकारणार नसल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जाहीर करत आपला विरोध प्रगट केला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. याबाबतची भूमिका निश्चित करण्यासाठी मंडलिक गटाचा रविवारी मेळावाही होणार आहे. मंडलिक गटाच्या हालचालींना वेग आला असताना देवणे यांनी आपली भूमिका मांडली.
देवणे म्हणाले, मंडलिक यांचे सुरुवातीपासूनचे राजकारण सोयीनुसार आणि बदलत्या राजकीय दिशेने सरकत राहल्याचे आहे. काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत असल्याचे सांगत मंडलिक वेळोवेळी आपली भूमिका बदलत आलेले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी अपक्ष म्हणून लढलेल्या मंडलिकांनी काँग्रेस पक्षात पुन:श्च प्रवेश करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. पण निवडणूक सरताच सहा महिन्यात काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारून आपल्या स्वार्थी राजकारणाचे दर्शन घडविले. आघाडी धर्माचे पालन करायचे झाले तर राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा प्रचार करावा लागेल याची बोच सतावत असल्याने मंडलिक महायुतीकडे येऊ लागले आहेत. गतवेळी त्यांचा विजय स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाडिक गट व मंडलिक गटाची मते यामुळे झाला होता.     
आता मात्र त्यांच्यासोबत ना महाडिक ना स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. उलट शिवसेनेची लोकसभा मतदारसंघातील पारंपरिक दोन लाख मते, स्वाभिमानीचे मते आणि मंडलिक गट यांची गोळाबेरीज करून निवडणूक जिंकण्याचे ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर आहे. तथापि दलबदलू भूमिका घेणाऱ्या मंडलिक यांच्या महायुतीच्या प्रवेशाला व उमेदवारीला आपला विरोध आहे.