भय्युजी महाराजांच्या प्रेरणेतून तालुक्यात विविध योजना राबविल्या जात आहेत. त्या अंतर्गत याचाच एक भाग म्हणून विविध विद्यालयात संविधान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. जवळपास सहा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन या उपक्रमात सहभाग नोंदविला.
तालुक्यात ५ जानेवारी रोजी साईबाबा विद्यालय टेंभी, टी.जी. देशमुख विद्यालय आमणी, शिवाजी विद्यालय आमणी, शिवाजी विद्यालय सवना, विठ्ठल-रुख्मिणी कला व वाणिज्य महाविद्यालय सवना, सावित्रीबाई कन्या शाळा महागाव, मातोश्री विद्यालय महागाव, मनोहर नाईक विद्यालय गुंज, मारोतराव पाटील विद्यालय अंबोडा, उच्च प्राथमिक मराठी शाळा वाकोडी आदि ठिकाणी संविधान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.
भय्युजी महाराजांच्या प्रेरणेतून दत्त धार्मिक व पारमाíथक ट्रस्ट इंदोर यांच्या माध्यमातून या स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टअंतर्गत ‘बेटी बचाओ‘ अभियानच्या माध्यमातून कासाळबेहळ, वाकोडी, लेवा येथे विद्यार्थ्यांनी रॅली काढून जनजागृती केली. भय्युजी महाराजांच्या प्रेरणेतून तालुक्यात वन्यप्राणी, पशुपक्ष्यांसाठी जीवनदान अभियान उपक्रम सुरू आहेत. भारतीय संविधान देशाचा आत्मा आहे. प्रत्येकाला त्याविषयी आदर असणे आवश्यक आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांत संविधानाबाबत माहिती व आदराची भावना निर्माण झाली आहे. सूर्योदय परिवार शाखेच्या वतीने वाकोडी येथील सरपंच सुरेश देशमुख वाकोडीकर यांनी परीक्षेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.
परीक्षेसाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.