अंजनेरी येथील सपकाळ नॉलेज हबच्यावतीने आयोजित ‘अस्तित्व २०१५’ या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. अभिनेत्री रविना टंडन यांची प्रमुख उपस्थिती होती. मानसी नाईक हिच्यासह विद्यार्थ्यांनी केलेल्या बहारदार नृत्याने महोत्सवाची रंगत वाढली.
विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठय़े ठरले. मान्यवरांच्या हस्ते अस्तित्व २०१५ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. आपल्यातील विविधांगी कलागुणांचे सादरीकरण करतांना विद्यार्थ्यांनी हिंदी तसेच मराठी गीतांवर सदाबहार नृत्य सादर केले. गिटार वादन, मिमिक्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. नकलाकार विद्यार्थ्यांचे अभिनेत्री रविना टंडन यांनी विशेष कौतुक केले. जय शारदे वागेश्वरी, माऊली माऊली ही भक्तीगीते सादर झाली. रविना यांच्या मोहरा चित्रपटातील तु चीज बडी है मस्त. या गाण्याने उपस्थितांना थिरकण्यास भाग पाडले. अखियोंसे गोली मारे या गीतावर तर रविनाने दिलखुलास दाद दिली. महोत्सवात ‘मिस आणि मिस्टर एसकेएच’ निवडण्यात आले. तसेच क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अभिनेत्री मानसी नाईक हिच्या बहारदार नृत्यास सर्वानी दाद दिली. नृत्यांगणा निशा हिच्या नृत्याने महोत्सवाची रंगत वाढविली. यावेळी रविनाने सपकाळ नॉलेज हब आधुनिक गुरूकुल असल्याचे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून आ. हर्षवर्धन सपकाळ, विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे, संस्थेचे प्रमुख रवींद्र सपकाळ, उपाध्यक्ष कल्याणी सपकाळ आदी उपस्थित होते.