उगवत्या नव्या वर्षांचे सुरेल स्वागत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने २०१४च्या सुरुवातीलाच ‘सप्तरंग’ उधळण्याचे ठरवले आहे. मुंबईकरांसह पर्यटकांनाही अस्सल संगीताची मेजवानी देण्यासाठी संचालनालयाने ३ ते ९ जानेवारी दरम्यान मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे ‘सप्तरंग’ या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात गानसरस्वती पद्मविभूषण किशोरीताई आमोणकर, शंकर महादेवन, ए. सिवामणी, यु. श्रीनिवास, रुपकुमार राठोड, भूपिंदर आणि मिताली सिंग यांसारखे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार ३ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव सामान्य प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे.
संगीत क्षेत्रातील अग्रणी मानल्या जाणाऱ्या ‘पंचम निषाद’ या संस्थेच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होईल. या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘सदर्न एक्सप्रेस’ हा दाक्षिणात्य संगीताचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात शंकर महादेवन यांचे गायन तर ए. सेल्वागणेश, यु. श्रीनिवास, विक्कू विनायकराम आणि ए. सिवामणी यांचे वादन एकत्रितपणे रंगेल. मेंडोलिन, ड्रम, घट्टम्, कंजिरा यांची ही जुगलबंदी नक्कीच श्रवणीय ठरणार आहे.
शनिवार, ४ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता रुपकुमार राठोड यांचा ‘सुफियाना’ हा सुफी संगीताचा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता तरुण संगीतकार ‘रिवा आणि ग्रुप’ तरुणाईला आपल्या तालावर नाचवणार आहेत. या संध्याकाळचे रंग अधिक गडद झाल्यानंतर ही संध्याकाळ भूपिंदर आणि मिताली सिंग आपल्या गजल गायनाने अविस्मरणीय करतील.
रविवारची सकाळ उगवेल ती गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे दैवी सूर उमटवत! किशोरीताई सकाळी ६.३० वाजता मंगल प्रभात हा कार्यक्रम सादर करणार आहेत. याच दिवशी संध्याकाळी ‘बॉलिवूड नाइट’ हा कार्यक्रम सलीम आणि सुलेमान हे दोघे संगीतकार सादर करतील.
६ आणि ७ जानेवारी, सोमवार व मंगळवार या दिवशी हा महोत्सव वाशीच्या विष्णुदास भावे सभागृहात होणार आहे. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार सोहळा होणार आहे. यंदा हा पुरस्कार प्रसिद्ध तमाशा कलावंत प्रभा शिवणेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. मंगळवारी याच वेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे समग्र दर्शन घडवणारा ‘माय मराठी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
त्यानंतर ८ व ९ जानेवारी अर्थात बुधवार व गुरुवार या दोन दिवशी हा महोत्सव ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात होईल. ८ जानेवारी रोजी नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सोहळा होणार आहे. यंदा हा पुरस्कार अरुण काकडे याना प्रदान होणार आहे. त्याचबरोबर देण्यात येणारा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार यंदा रामदास कामत यांना प्रदान करण्यात येईल. या सोहळ्यानंतर ‘नमन नटवरा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
गुरुवार, ९ जानेवारी रोजी अष्टपैलू गायक मन्ना डे यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या गीतांचा ‘तू सूर का सागर है’ या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यात केले आहे. या महोत्सवाच्या विनामूल्य प्रवेशिका रिदम हाऊस (फोर्ट), महाराष्ट्र वॉच कंपनी (दादर), रवींद्र नाटय़ मंदिर (प्रभादेवी), गडकरी रंगायतन व डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह (ठाणे) आणि विष्णुदास भावे नाटय़गृह (वाशी) येथे उपलब्ध होतील.