‘सारांश’ हा माझा पहिला चित्रपट. तिथपासून ते  ‘सिल्वर लाईनिंग्ज प्लेबुक’ या पहिल्या अमेरिकन चित्रपटापर्यंतचा माझा प्रवास हा अतिशय अविस्मरणीय असा आहे. वयाच्या २७ व्या वर्षी मी ‘सारांश’ या चित्रपटात ६७ वर्षांच्या वृद्धाची भूमिका केली होती. त्या चित्रपटाला ऑस्कर नामांकनही मिळाले होते. आज इतक्या वर्षांनंतर कारकि र्दीच्या या टप्प्यावर मला रॉबर्ट डी निरो, डेव्हिड रसेल यांच्यासारख्या हॉलीवूड दिग्गजांबरोबर मानाची भूमिका करायला मिळाली. आणि त्याच ‘सिल्वर लाईनिंग्ज प्लेबुक’लाही ऑस्कर नामांकन मिळाले. या चित्रपटाला मिळालेल्या यशाने माझ्या अभिनय प्रवासाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे, अशा शब्दांत अभिनेता अनुपम खेर यांनी आपल्या कृतार्थतेच्या भावना व्यक्त केल्या.
‘सिल्वर लाईनिंग्ज प्लेबुक’ या चित्रपटाच्या समस्त कलाकारांसह अनुपम खेर यांनी रविवारी रात्री झालेल्या १९ व्या वार्षिक ‘स्क्रीन अॅक्टर गिल्ड अॅवॉर्ड’ सोहळ्यात हजेरी लावली होती. पाठोपाठ २४ फेब्रुवारी २०१३ रोजी ऑस्कर पुरस्कार सोहळा होणार असून तिथेही अनुपम खेर आपल्या युनिटसह हजर राहणार आहेत. ‘सिल्वर लाईनिंग्ज प्लेबुक’ला यश मिळाल्यानंतर अभिनेता अनुपम खेर यांच्या अभिनयाचीही जागतिक स्तरावर नोंद झाली आहे. त्यामुळे सुखावलेल्या अनुपम खेर यांनी आपल्या एकंदरीतच कारकिर्दीविषयी मनोगत व्यक्त केले.
‘मुंबईला अभिनय करण्यासाठी दाखल झालो तेव्हा माझ्यासारख्या डोक्याला टक्कल असलेल्या माणसाला कोण काम देणार, हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. महेश भट्ट यांच्या ‘सारांश’ चित्रपटात पहिले काम मिळाले ते ६७ वर्षीय वृद्धाचे आणि माझे वय तेव्हा होते २७ वर्षे. पण ती भूमिका मी केली. त्या चित्रपटाने मला ऑस्कर नामांकनही मिळवून दिले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव मिळवून दिले. ‘सारांश’ पूर्ण केल्यानंतर माझ्या हातात एकूण ५७ चित्रपटांच्या ऑफर्स होत्या. कारण मी वेडय़ासारखा चित्रपट करीत सुटलो होतो. दिवसा उठायचे आणि सेटवर सुटायचे, हा माझा दिनक्रम होता,’ अनुपम खेर यांनी आपल्या स्ट्रगलच्या आठवणींना उजाळा दिला. ‘आत्तापर्यंत मी साडेचारशे विविध चित्रपटांतून काम केले आहे. त्यात बरे, वाईट, चांगले, अतिशय फुटकळ.. असा विचार मी कधीच केला नाही. मी फक्त काम करीत होतो. ती माझी धावपळ आता ‘सिल्वर लाईनिंग्ज प्लेबुक’ या चित्रपटाने थांबविली आहे. याच्यापुढे असेच चित्रपट मला मिळावेत यासाठी मी प्रयत्न करीत राहणार आहे. ‘सारांश’मधील भूमिकेएवढी समर्थ भूमिका या चित्रपटात नव्हती. पण या चित्रपटाने मला रॉबर्ट डी निरोसारख्या आंतरराष्ट्रीय कलाकाराबरोबर मोठय़ा पडद्यावर एक पूर्ण लांबीची भूमिका करू दिली. माझ्या अभिनयाची एक ओळख निर्माण करून दिली, हीच  गोष्ट मला आनंद देऊन गेली. आत्ता माझे लक्ष ऑस्कर पुरस्कारांकडे आहे. मला स्वत:ला पुरस्कार मिळाला नाही तरी चालेल, पण या चित्रपटाचा मी एक भाग होतो, हे कायम माझ्या लक्षात राहील’, असे अनुपम यांनी म्हटले आहे.