सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात मोठय़ा पुतळ्य़ाच्या उभारणीसाठी लातूर जिल्हय़ातील ९४७ गावांतून एक किलो लोखंड व एक मूठ माती पाठवली जाणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
पुतळ्य़ासाठी देशातील सर्व खेडय़ांतून एक किलो लोखंड व एक मूठ माती संकलित करण्यास गुजरातेतून जिल्हय़ात १००८ बॉक्स पाठविले आहेत. प्रत्येक गावच्या सरपंचाचे नाव लिहून त्याच्या सहीनिशी बॉक्स पाठवले जाणार आहेत. जिल्हय़ात १६ ते २८ जानेवारी दरम्यान नवमतदार नोंदणी अभियान राबविले जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत याचे नियोजन केले आहे. भाजपच्या वतीने ‘एक नोट एक व्होट’ अभियानही याच काळात जिल्हय़ात राबवले जाणार आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात १ हजार ८७२ मतदान केंद्रे असून, प्रत्येक केंद्रावर १० कार्यकर्त्यांची रचना पूर्ण झाली आहे. लवकरच मतदासंघातील बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व खासदार गोपीनाथ मुंडे यास उपस्थित राहणार असल्याचे निडवदे यांनी सांगितले. माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, गोिवद केंद्रे, गणेश हाके, रमेश कराड, गुरुनाथ मगे, प्रा. विजय क्षीरसागर, प्रवीण कस्तुरे उपस्थित होते.
मतभेद मिटले
जिल्हय़ात पक्षांतर्गत किरकोळ मतभेद होते, मनभेद कधीच नव्हते. आता परिस्थितीच्या रेटय़ामुळे किरकोळ वाद संपवून सर्व जण एकत्रित कामाला लागणार असल्याचेही निडवदे यांनी सांगितले.