News Flash

जळजळीत वास्तवावर प्रकाशझोत

महिलांवरील अत्याचारांच्या घटना आणि नराधमांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच एखाद्या घटनेचा समाजातील विविध घटक

| September 15, 2013 01:07 am

महिलांवरील अत्याचारांच्या घटना आणि नराधमांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच एखाद्या घटनेचा समाजातील विविध घटक, राजकारणी कसा वापर करून घेतात आणि न्याय मिळतो म्हणजे काय, न्याय मिळत नाही म्हणजे काय, याचा अर्थ लावून पाहण्याची वेळ समाजावर आली आहे, याची जळजळीत जाणीव ‘सत ना गत’ हा सिनेमा अतिशय दाहक पद्धतीने करून देतो. लेखक राजन खान यांच्या ‘सत ना गत’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. दिल्ली आणि अलीकडेच मुंबईत घडलेला सामूहिक बलात्कार या दोन घटनांचे तीव्र पडसाद उमटत असतानाच राजू पार्सेकर दिग्दर्शित ‘सत ना गत’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय.
नामी ही अतिशय गरीब कुटुंबातील गृहिणी मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतेय. अडाणी, अशिक्षित असलेल्या नामीचा नवरा दामू हा कामधाम न करता दारू, जुगार यात गुरफटलाय. नामी लोकांच्या घरी काम करून कशीबशी पोटाची खळगी भरते. पोलीस निरीक्षक आसोले नामीवर अत्याचार करतो आणि नंतर नामीचे आयुष्य बदलून जाते. राधानगरी तालुक्यातील एका गावात नव्वदच्या दशकात कथानक घडते. घटनेनंतर उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होतात, राजकारणी यानिमित्ताने आपली खेळी खेळतात, पोलीस खात्यात आसोलेचे विरोधक त्याला गोत्यात आणण्यासाठी या घटनेचा वापर करून घेतात, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आपल्या पद्धतीने ही घटना सनसनाटी करून दाखवितात, समाज नामीकडे कशा नजरेने पाहू लागतो, नामीला न्याय मिळतो का किंवा काय याभोवती सबंध सिनेमा फिरत राहतो.
पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये गरीब, अशिक्षित आणि समाजाच्या निम्नस्तरातील स्त्रीची अवहेलना समाज कशा पद्धतीने करतो याचे दाहक चित्रण दिग्दर्शकाने समर्पक पद्धतीने केले आहे. नामी या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखेची अवस्था अत्याचाराच्या घटनेनंतर किती भयंकर प्रकाराने खालावते ते चित्रपटात प्रामुख्याने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेपूर्वीही पुरुषी नजरा चुकवून मान खाली घालून अपमान सहन करत नामी जगत असते. आधीच आयुष्याची परवड चाललेली असताना एका घटनेनंतर तिच्या अख्ख्या आयुष्याची परवड होते. तिच्या अवहेलनेचा कडेलोट समाजाकडून केला जातो. तिला नुकसानभरपाई देण्याची आश्वासने दिली जातात, अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा प्रयत्न नामी करीत असताना एकसारखे अत्याचाराच्या घटनेचा पाढा वाचण्याची वेळ तिच्यावर येते. न्याय देऊ नका पण काम द्या, पोटाची खळगी भरू द्या अशी याचना नामी करते. परंतु तिचे कुणीच ऐकत नाही. त्यामुळे न्याय मिळाला काय किंवा न मिळाला काय आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी समाजातील व्यक्ती काम देऊ शकत नाही तर न्याय मिळून तरी काय उपयोग असा गंभीर प्रश्न नामी उपस्थित करते.
नामी या भूमिकेतील नवोदित तारका पाखी हेगडे, आसोलेच्या भूमिकेतील महेश मांजरेकर, संपादक शिंदेच्या भूमिकेतील सयाजी शिंदे आणि नामीला मदत करू इच्छिणारा वाबळेच्या भूमिकेतील भरत जाधव यांनी भूमिकेला न्याय देता येईल अशा पद्धतीने अभिनय केला आहे. नवोदित असूनही पाखी हेगडेने आपली अभिनयाची झलक आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटांतून चांगल्या प्रकारे दाखवली आहे. अनेक विनोदी चित्रपटांचा अनुभव गाठीशी असताना गंभीर विषयावरील चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.
आजच्या सामाजिक परिस्थितीत प्रेक्षकाला अंतर्मुख करण्याची ताकद मूळ लेखकाच्या कादंबरीप्रमाणेच चित्रपटातही प्रत्ययकारी पद्धतीने आणली आहे. त्यामुळे चित्रपट भिडतो. परंतु यामध्ये सर्वसामान्य पद्धतीने चित्रपट मनोरंजन करू शकत नाही. परंतु आजच्या परिस्थितीत खासकरून अत्याचाराच्या घटनांचा चढता आलेख पाहिला तर ‘सत ना गत’ चित्रपट काळाला अनुसरून प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहताना त्यातील प्रसंगांचा, विविध व्यक्तिरेखांच्या वागण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न स्वत:च्या मनात नकळतपणे करू लागतो इतका परिणामकारक चित्रपट दिग्दर्शकाने नक्कीच तयार केला आहे.
सत ना गत
निर्माते – रेणुका मिटकरी, राजकुमार गुगळे, मनोज गुप्ता.
सहनिर्माता – अभिजीत घोलप.
दिग्दर्शक – राजू पार्सेकर.
छायालेखक – वहाब.
मूळ कथा – राजन खान.
पटकथा-संवाद – अरविंद जगताप.
संगीत – प्रवीण कुवर.
गीते – नितीन तेंडुलकर, अरविंद जगताप.
कलावंत – महेश मांजरेकर, सयाजी शिंदे, भरत जाधव, पाखी हेगडे, संतोष शिंदे, दिगंबर नाईक, वैभव मांगले.
दिनेश असोले-महेश मांजरेकर, संपादक शिंदे – सयाजी शिंदे, उत्तम वाबळे – भरत जाधव, नामी – पाखी हेगडे, पाखीचा नवरा दामू -संतोष शिंदे, बदामराव – दिगंबर नाईक, संपादक गुराळे- वैभव मांगले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:07 am

Web Title: sat na gat marathi film focuses on bitter reality
टॅग : Marathi Film
Next Stories
1 बहुबालिश मस्ती
2 होय, सलमान खान शुद्ध मराठीत बोलला..
3 नेहरू सेंटरचा बहुभाषिक राष्ट्रीय नाटय़ोत्सव
Just Now!
X