भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे स्वर्गीय खाशाबा जाधव यांचा सातारा जिल्ह्याला अभिमान असून, त्यांच्याप्रमाणे नावलौकिक वाढवणारे खेळाडू येथे निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून, शासनामार्फत खेळाडूंवर केला जाणारा खर्च म्हणजे पदकप्राप्त करून घेण्यासाठी केलेली गुंतवणूक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. रामस्वामी एन. यांनी सांगितले.
दिवंगत ख्यातनाम मल्ल खाशाबा जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त सातारा येथे राष्ट्रीय स्पध्रेत प्रावीण्य प्राप्त केलेल्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा शिक्षणाधिकारी मकरंद गोंधळी, क्रीडा अधिकारी आमसिध्द सोलनकर, सुनील धारूकर, श्रीमती मनीषा पाटील, क्रीडा मार्गदर्शक बळवंत बाबर, अभय चव्हाण, प्रसन्न नलवडे, सूर्यकांत पवार, रणजीत जाधव यांची उपस्थिती होती. स्वर्गीय खाशाबा जाधव हे इयत्ता ७ वीमध्ये असताना त्यांची हस्तलिखित वही याप्रसंगी सर्व खेळाडूंना दाखविण्यात आली. खेळाडूदेखील वही व त्यांचे मराठी व इंग्रजी अक्षर पाहून भारावून गेले.
रणजित जाधव म्हणाले की, संपत्ती संपली तरी काहीही फरक पडत नाही. आरोग्य नष्ट झाले तर काहीतरी फरक पडतो, पण चारित्र्य संपले की सर्वच संपते. स्वर्गीय पहिलवान खाशाबा जाधव हे खेळाडू होतेच, त्यांचबरोबर ते एक चांगले नागरिकदेखील होते. अशा खेळाडूंच्या कार्यकालाचे अवलोकन करून त्यांच्याप्रमाणे वागून जीवनमान यशस्वी करावे. ऑलिम्पिक पदक विजेते घडलेच पाहिजेत, त्याचबरोबर त्यांच्यामधून चांगले नागरिकदेखील निर्माण होणे आवश्यक आहे. खेळाडूंनी खेळाबरोबरच शिक्षणदेखील घेतलेच पाहिजे. या वेळी यशस्वी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांना ट्रॅकसूट व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.