केबीसी घोटाळ्याची व्याप्ती बरीच मोठी असून पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत. तपासातील माहिती उघड झाल्यास त्याचा लाभ गुन्हेगाराला मिळून तो सावध होऊ शकतो. राज्यात केबीसीसारख्या अनेक चिट फंड कंपन्या कार्यरत असल्याची तक्रार भाजपचे खा. किरीट सोमय्या यांनी केली, पण त्याचा खुद्द सोमय्या यांनीच पाठपुरावा करून केंद्र शासनाकडून त्या कंपन्या बंद कराव्यात, असे आव्हान गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले. महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या वतीने मंगळवारी आयोजित प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११० व्या दीक्षान्त सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दीक्षान्त सोहळ्यात त्यांनी राज्यात लवकरच गणेशोत्सवास सुरुवात होत असून याची मोठी जबाबदारी पोलीस यंत्रणेवर असून आपली कार्यक्षमता जगाला दाखविण्याची ही संधी असल्याचे सांगितले.
त्र्यंबक रस्त्यावरील अकादमीच्या मैदानावर झालेल्या सोहळ्यास पोलीस महासंचालक संजीव दयाल, अपर पोलीस महासंचालक व्यंकटेशन व अकादमीचे संचालक नवल बजाज उपस्थित होते. ११० व्या सत्रातून ७६४ उपनिरीक्षक पोलीस दलात रुजू झाले. पाटील यांनी संचलनाचे निरीक्षण केले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केबीसी घोटाळ्याबाबत त्यांनी या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता तपासाची व प्रगतीची माहिती उघड करता येणार नसल्याचे सांगितले. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे असून याबाबत पोलीस प्रशासनाने नेहमी ‘अपडेट’ राहणे आवश्यक आहे. पुढील पाच वर्षांत ६० हजार पोलिसांची भरती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दीक्षान्त सोहळ्यात मार्गदर्शन करताना पाटील यांनी बदलत्या काळात कशावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने जागरूक राहणे आवश्यक असल्याची जाणीव करून दिली. महाराष्ट्राला शूरत्वाचा वारसा लाभला आहे. वर्दीचा जसा रुबाब असतो, तसेच जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असते. देशाच्या सीमेचे संरक्षणाची जबाबदारी जशी जवानांची आहे तसेच अंतर्गत कायदा व सुव्यवस्था व जनतेच्या जीविताचे रक्षण करणे हे तितकेच महत्त्वाचे काम आहे. यामुळे सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी आपली सेवा प्रामाणिकपणे द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अकादमीचे संचालक बजाज यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना शपथ दिली. नवीन कायद्यानुसार सर्व प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यात आले असून सर्वानी कायद्याचे सेवक व जनतेचे रक्षक म्हणून काम करावे असे आवाहन बजाज यांनी केले.

संदीप शिंदे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी
प्रशिक्षणार्थी तुकडीतील सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून संदीप शिंदे यांना गौरविण्यात आले. तसेच वर्तणूक शास्त्रमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल संतोष शिंदे, अष्टपैलू महिला प्रशिक्षणार्थी दीपाली वाघ, योगेश गायकर यास द्वितीय सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, रायफल व पिस्तुल नेमबाजी तसेच उत्कृष्ट कवायत या पारितोषिकांनी गौरविण्यात आले. उत्कृष्ट कायदा प्रशिक्षणार्थी किरण भालेकर, टर्न आऊट अमोल पन्हाळकर, उत्कृष्ट खेळाडू रमेश दगडे, आधुनिक तंत्रज्ञान नाना सूर्यवंशी, उत्कृष्ट गुन्हे शोध प्रशिक्षणार्थी मंगेश भोयर, सांस्कृतिक अजित कांबळे, क्रिमिनालॉजी व पेनालॉजी विषयातील कामगिरीबद्दल अमित गोते यांना गौरविण्यात आले.

प्रवेशद्वारांवर आडकाठीचा निकष
कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे त्र्यंबक रस्ता व आसपासच्या भागात सकाळपासून वाहनांची मोठी गर्दी झाली. उपस्थित राहणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात आला. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या निकषाचा फटका प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही बसला. कित्येक जण विलंबाने आतमध्ये पोहोचले. कार्यक्रम झाल्यावर त्र्यंबक रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.