आगामी वर्षांत पर्जन्यमान समाधानकारक राहील असा दिलासा येथील श्री भैरवनाथ मंदिरात सोडण्यात आलेल्या पारंपारिक शिदोरीने दिला आहे. समाधानकारक पावसामुळे मुबलक धान्योत्पादन होईल, नैसर्गिक आपत्ती, युद्घजन्य परिस्थिती तसेच राजकीय घमासान असेही भाकीत या शिदोरीत वर्तवण्यात आले आहे. प्रथेप्रामणे काल (रविवारी) ही शिदोरी सोडण्यात आली.
पौष पौर्णिमेस ग्रामदैवत भैरवनाथांच्या गाभाऱ्यात विविध धान्यांची शिदोरी बांधण्यात येते, ती माघ पौर्णिमेस सोडण्यात येते. शिदोरी सोडल्यानंतर त्यातील धनधान्याच्या स्थितीवर आगामी वर्षांतील पाऊसपाणी, संभाव्य संकटांचा होरा व्यक्त करण्यात येतो. गव्हाच्या कणकेच्या दोन वाटया तयार करण्यात येऊन एका वाटीत भात व मेथीची भाजी तर दुसऱ्या वाटीत विविध प्रकारचे धान्य ठेवण्यात येते. दोन्ही वाटया एकत्र जोडण्यात येऊन त्या शुभ्र कापडात गुंडाळण्यात येतात. पंचरंगी नाडयाच्या सहाय्याने ही शिदोरी श्री भैरवनाथांच्या गाभाऱ्यात पौष पोर्णिमेस विधीपुर्वक बांधण्यात आल्यानंतर आश्लेषा पौर्णिमेस ही शिदोरी उघडण्यात येते. पारंपारीक पद्घतीनुसार काल (रविवारी) अश्लेषा पौर्णिमेस शिदोरी सोडण्यात आली.
शिदोरी सोडण्यात आली, त्यावेळी नाडा तसेच कापड सुस्थितीत निघाले. नाडय़ाचे तुकडे झाल्यास, कापड फाटल्यास पिडा, संघर्ष तसेच चिंतेची स्थिती असणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात येते. पिठाच्या कणकेतील धान्याची स्थिती ओली आढळून आल्याने सर्वत्र समाधानकारक पर्जन्यमान होऊन धान्योत्पादन मुबलक होईल असे होरा वर्तविण्यात आला. मात्र दोन्ही वाटय़ातील धान्य एकत्र होउन त्यात खड्डा पडल्याने आपत्तीजनक स्थिती निर्माण होईल असे सांगण्यात आले.
यापुर्वीही अशा प्रकारे धान्य एकत्र होउन खड्डा पडल्यामुळे नैसर्गिक आपत्ती, युद्घजन्य परिस्थिती, किंवा राजकीय घमासानाचा प्रत्यय आल्याचे राधाकिसन पुजारी यांनी सांगितले.शिदोरी सोडल्यानंतर श्री.भैरवनाथांनी चार वेळा प्रसाद दिला. विघ्ने आली तरीही ती परतवून लाऊन नागरिकांना संकटापासून वाचविले जाईल असा त्यापासून बोध होत असल्याचेही पुजारी यांनी सांगितले.