पाटण पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत‘लेक वाचवा अभियान प्रभावीपणे राबविण्यात आल्यामुळे पाटण तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत दर हजारी मुलींचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. १३ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी केवळ तीन केंद्रे वगळता १० प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात मुलींचे प्रमाण वाढले असून, ही आकडेवारी अतिशय समाधानकारक आहे. या कामगिरीचे यश ‘लेक वाचवा’ अभियान यशस्वी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच जाते, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळुंखे यांनी दिली.
समाजातील स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत‘लेक वाचवा अभियानाची सुरूवात झाली. या अभियानामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम महत्त्वाचे होते. पाटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वी करून दाखविले आहे.
तालुक्यातील सळवे प्राथमिक आरोग्य केंद्रात दर हजारी मुलींचे प्रमाण गतवर्षी ६९६ होते. यावर्षी ते प्रमाण ११५६ आहे. मरळी प्राथमिक आरोग्य केंद्रात ७५३ होते. ते यावर्षी १०३५ आहे. काळगाव ८१३  होते. यावर्षी ते १००० आहे. तारळेत ८११ होते. यावर्षी ९४५ आहे. सणबूरमध्ये ९५० होते. आता ते १०७९ पर्यंत वाढलेले दिसते. तळमावलेत हे प्रमाण ८४३ होते. यावर्षी ते ९१९ आहे. मल्हारपेठमध्ये ७६८ होते. यावर्षी हे प्रमाण ८४२ पर्यंत वाढले आहे. केरळमध्ये ३२५ होते. आता ९८२ आहे. सोनवडेत ८२४ होते. आता ८७४ पर्यंत पोचले आहे. चाफळमध्ये ८३४ होते. आता ते ८४३ आहे. मोरगिरी, मुरूड, हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मुलींचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत वाढण्याऐवजी घटले आहे.