कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कृष्णा, कोयनाकाठी पावसाचा रात्री चांगलाच जोर राहताना दिवसा मात्र, पावसाची रिमझिम कायम रहात असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, समाधानकारक पावसामुळे शेतकरी समाधानी आहे. शेतीच्या कामांनी वेग घेतला असून, दुसरीकडे शाळा सुरू झाल्याने शालेय साहित्य व पावसापासून बचाव करण्यासाठी लागणारे रेनकोट, छत्र्या आदी साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत.
आज सायंकाळी ६ वाजता कोयना धरणाची जलपातळी २ हजार ९४ फूट ९ इंच राहताना पाणीसाठा ४०.४७ टीएमसी म्हणजे ३८.४५ टक्के आहे. पैकी ३५.२२ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. १ जूनपासून धरणात सुमारे दहा टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. तर गेल्या चार, पाच दिवसातील संततधारेमुळे धरणाखालील पाटण व कराड  तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणीपातळीतही समाधानकारक वाढ झाली आहे. पावसाळी हंगामातील एकूण सरासरीच्या तुलनेत पंधरा टक्क्यांहून अधिक पाऊस कोसळला आहे.
पावसामुळे बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त आहे. दरम्यान, आज दिवसभरात पावसाची रिमझिम सुरू राहताना श्रावणातील ऊन पावसाचा अनुभवही मिळत होता. पावसाची रिपरिप राहात असली, तरी नित्याच्या या पावसामुळे बाजारपेठा बऱ्यापैकी फुलून आहेत. शालेय खरेदीसाठी बालगोपाळांसह कॉलेजकुमारांची सर्वत्र गर्दी असल्याचे चित्र आहे.
कोयना धरणाच्या जलपातळीत दिवसभरात १ फूट १ इंचाने वाढ होताना, पाणीसाठय़ात १. २७ टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या ४१ हजार ४६१ क्युसेक्स पाण्याची आवक कोयना धरणात होत आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कोयना धरण क्षेत्रात सरासरी १६९.३३ एकूण ९२५, पाटण तालुक्यात ४४.४१ एकूण ३०९.०८ तर, कराड तालुक्यात १६.१३ एकूण १३३.७७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात कोयना धरण क्षेत्रातील महाबळेश्वर विभागात सर्वाधिक १०२ एकूण ११३६, नवजा विभागात ७२ एकूण ९४८, कोयनानगर विभागात ५० एकूण ९१५ मि. मी. पाऊस होताना दिवसभरातील सरासरी पावसाची नोंद ७४.६६ मि. मी. झाली आहे. एकंदर कोयना धरण क्षेत्रात महाबळेश्वर विभागात ११३६ मि. मी., पाटण तालुक्यात पाटण विभागात सर्वाधिक ३७३ मि. मी. तर तारळे विभागात सर्वात कमी ११० मि. मी. एकंदर पावसाची नोंद झाली आहे. कराड तालुक्यात कोळे मंडलात सर्वाधिक १८९.३ तर, काले मंडलात सर्वात कमी १०४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात कराड व पाटण तालुक्यात ढगाळ वातावरण राहताना सर्वत्र पावसाच्या हलक्या ते भारी सरी कोसळत राहिल्याचे वृत्त आहे.  
जिल्ह्य़ातील पाऊस
जिल्ह्यात काल संततधार पाऊस सुरु होता. आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण ४१६.६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ११६.१ मि.मी. पाऊस महाबळेश्वर तालुक्यात नोंदला गेला आहे.  जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ३७.९  मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- ३८.८ (१७८.६) मि. मी., जावळी- ८८.६ (३८४.३) मि.मी., कोरेगांव- १९.३ (१३०.६) मि.मी., कराड- १६.१ (१३३.१) मि.मी., पाटण- ३७.५ (२६९.४) मि.मी., वाई- ५५.५ (२३४.७) मि.मी., महाबळेश्वर – ११६.१ (४१९.२) मि.मी., खंडाळा- २६.५ (१४८.६) मि.मी. फलटण- ५.६ (८३.३) मि.मी., माण- ३.८ (५८.२) मि.मी., खटाव- ८.८ (८५.१) मि.मी. याप्रमाणे आजपर्यंत एकूण २१२६.४ मि.मी. तर सरासरी १९३.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.