पावसाचा जोर गेल्या चार दिवसांत बऱ्यापैकी ओसरला असला तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मात्र, पावसाचा रात्रीचा जोर तर, दिवसाची ओढ अशी तऱ्हा कायम आहे. दरम्यान, दोन महिन्यांतील समाधानकारक दमदार गतवर्षीच्या दीडपट जादा तर आजवरच्या एकंदर सरासरीपेक्षा २० टक्क्यांवर अधिक राहिला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच लहानमोठे प्रकल्प पावसाळी हंगामाच्या ४० ते ४५ दिवसांतच भरभरून वाहिले आहेत.
अपवाद वगळता सलग ५५ दिवस कोसळलेल्या दमदार पावसामुळे बळीराजासह सर्वसामान्य जनता सुखावल्याचे चित्र आहे. धरणक्षेत्रासह त्याखालील कराड, पाटण तालुक्यातही पावसाची उघडझाप सुरूच असून, श्रावणातील ऊन-पावसाच्या खेळामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. कोयना धरणात चालू हंगामातील दोन महिन्यांत दररोज सरासरी २ टीएमसीपेक्षा जादा पाण्याची आवक झाली आहे. ६० दिवसांत १२६ टीएमसी पाण्याची आवक होताना, ५३.८४ टीएमसी पाणी दरवाजातून सोडण्यात आले. हे पाणीवापराविना वाया गेले आहे. तर सुमारे १० टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी कारणी लागले आहे. कोयना धरणातून हा एकंदर विसर्ग सुमारे ६४ टीएमसी झाला आहे.
आज सायंकाळी ६ वाजता धरणाची जलपातळी २ हजार १५६ फूट ४ इंच राहताना, पाणीसाठा ९६ टीएमसी म्हणजेच ९१.२१ टक्के आहे. गतवर्षी हीच पाणीपातळी २ हजार १४१ फूट २ इंच राहताना पाणीसाठा ८० टीएमसी म्हणजेच ७६ टक्के होता. आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रातील कोयनानगर विभागात २० एकूण ४५५१, महाबळेश्वर विभागात ३० एकूण ४८४९, प्रतापगड विभागात ४५ एकूण ४०४२ तर नवजा विभागात सर्वाधिक ६२ एकूण ५३४९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात धरणक्षेत्रात ११.३३ मि.मी. पाऊस झाला आहे. आजअखेर सरासरी ४७०९.०८ मि.मी. पाऊस झाला असून, गतवर्षी हीच सरासरी ३०६३.६६ मि.मी., तर कोयनानगर विभागात ८७ एकूण २७८९ मि.मी., महाबळेश्वर विभागात १२२ एकूण सर्वाधिक ३२०६ मि. मी. तर नवजा विभागात ११४ एकूण सर्वाधिक ३१२६ मिलीमीटर पावसाची नोंद आहे.