राज्य सरकारच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्ड) सदस्यपदी सतीश लोटके यांची निवड करण्यात आली आहे. कै. रघुनाथ क्षीरसागर, रतनलाल सोनग्रा, जवाहर मुथा यांच्यानंतर तब्बल १५ वर्षांनी नगरच्या रंगकर्मीस ही संधी मिळाली.
लोटके अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या नगर शाखेचे माजी अध्यक्ष आहेत. नगरच्या हौशी कलावंतांना सादरीकरणाच्या परवागीसाठी पुणे किंवा मुंबईला जावे लागत असे, आता लोटके यांच्या नियुक्तीमुळे हा मार्ग सोपस्कर झाला आहे. राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करत कालच राम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त ३४ सदस्यांची नावे जाहीर केली.
सतीश लोटके नाटय़अभिनेते, दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत. राज्य नाटय़ व एकांकिका स्पर्धेतही त्यांनी पारितोषिके मिळवली आहेत. सध्या ते नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीवर राज्यातील सर्व शाखांचे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. लोटके यांच्या नियुक्तीचे खा. दिलीप गांधी, अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी अनिल क्षीरसागर, पी. डी. कुलकर्णी, मोहन सैद तसेच नगर शाखेने अभिनंदन केले.