समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना पर्याय नाही. हे विचार नव्या पिढीत संस्कार स्वरूपात रुजविण्याचे काम सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठ करत आहे. सत्यशोधक ज्ञानपीठ परीक्षांचे अभ्यासग्रंथ केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणासाठी नव्हे तर जीवनग्रंथ म्हणून आत्मसात केले पाहिजेत, असे आवाहन पोलीस प्रबोधिनीचे अधीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
येथील सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सातपूर महाविद्यालयाचे प्राचार्य के. के. पडघलमल हे होते. सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठाचा राज्यस्तरीय परीक्षांचा अभ्यासक्रम फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारकार्यावर आधारित असल्याने या परीक्षांच्या माध्यमातून नव्या पिढीच्या मनात समतावादी विचारांची पेरणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. सत्यशोधक ज्ञानपीठतर्फे १९ वर्षांपासून तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, अहिल्याबाई होळकर, प्रबोधनकार ठाकरे आदी महामानवांच्या जीवनकार्यावर अभ्यासक्रम तयार केला जातो व त्यावर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या वर्षी राजमाता जिजाई, लोकमाता अहिल्याबाई होळकर व समाजमाता रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर ‘समता संगराच्या क्रांतिनायिका’ हा अभ्यासक्रम ग्रंथ तयार करण्यात आला.
त्यावर क्रांतिनायिका परीक्षा झाली. दुसरी परीक्षा ‘ज्योती सावित्रीचे अखंड महाकाव्य’ या ग्रंथावर घेण्यात आली. या दोन्ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्य़ांत २०० केंद्रावर एकाच दिवशी घेण्यात आली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पडघलमल यांनी परीक्षार्थीना सत्यशोधक परीक्षेच्या माध्यमातून मिळालेल्या सामाजिक ज्ञानाचा उपयोग विधायक कार्यासाठी करण्याचे आवाहन केले.
ज्ञानपीठच्या संयोजिका शोभा देवरे यांनी परीक्षेचे सामाजिक महत्त्व समजावून सांगितले. महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी रोहिणी भंदुरेने आभार मानले.