शहराच्या कला व सांस्कृतिक क्षेत्राचे प्रतिबिंब असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाचे वा. गो. कुलकर्णी कलादालन जमीनदोस्त करण्यात आले आहे. पावसाळ्यातील गळती रोखण्यासाठी आणि नुतनीकरणासाठी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्याचा दावा वाचनालयातर्फे करण्यात येत असला तरी कलादालनाचे बांधकाम अनधिकृत असल्याने महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी वाचनालयाकडून तातडीने हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले जाते.
शहराच्या कला, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडीचा साक्षीदार राहिलेल्या सार्वजनिक वाचनालयाने कलाप्रेमींची अभिरुची जपण्यासाठी १९९९ मध्ये वा. गो. कुलकर्णी या स्वतंत्र कलादालनाची निर्मिती केली. परशुराम साईखेडकर नाटय़मंदिराच्या आवारातच कुलकर्णी यांच्या बंधुंनी दिलेली पाच हजार रूपयांची देणगी आणि वाचनालयाच्या निधीच्या मदतीने छोटय़ा जागेत हे कलादालन सुरू झाले. नवोदित, हौशी तसेच जुन्याजाणत्या कलावंतांच्या साहित्यकृती, चित्रकृतीची अनुभूती रसिकांना वाचनालयाच्या आवारात घेता यावी, हा दालन निर्मितीमागील हेतू होता. वाचनालयाच्या या छोटेखानी कलादालनावर आजवर कलाप्रेमींनी भरभरून प्रेम केले. दुसरीकडे, नाटय़गृहातील कार्यक्रमांना आलेल्या प्रेक्षकांना, त्यांनी आणलेल्या वाहनांना कलादालनाची अडचण होऊ लागली. कलादालन नाटय़मंदिराच्या संरक्षण भितीला लागून आहे.
महापालिकेने २००९ मध्ये हे कलादालन अनधिकृत असल्याची नोटीसही वाचनालयाला बजावली होती. मात्र तत्कालीन कार्यकारिणीने याकडे दुर्लक्ष करत आपले कामकाज सुरू ठेवले.
जुन महिन्याच्या सुरूवातीलाच आलेल्या पहिल्या पावसात कलादालन गळू लागले. याशिवाय आग प्रतिबंधक योजना या ठिकाणी नाही. तसेच कलाकृती वा साहित्यकृतीच्या सुरक्षेच्या दृष्टिने उपाययोजना नसल्याने कलादालनाच्या नुतनीकरणाचा विचार प्रामुख्याने करण्यात आला असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी सांगितले. त्यानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत कलादालन पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कलादालन वाचनालयाच्या पोथी विभागात सुरू राहणार आहे. नजीकच्या काळात वाचनालयाच्या आवारातच कलादालनाची निर्मिती करण्यात येईल. कलादालनाची जागा तसेच नाटय़गृहाबाहेरील परिसर याचा वापर संपूर्णत वाहनतळ म्हणून करण्यात येणार असल्याचे औरंगाबादकर यांनी सांगितले.